David Warner Six, AUS vs PAK 1st Test: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून पहिल्या कसोटीला सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा आक्रमक फॉर्म पाहायला मिळाला. वॉर्नरने शानदार खेळ करत साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले. वॉर्नरची फलंदाजी पाहून तो टी२० सामना खेळत असल्याचाच भास होत होता. यावेळी त्याच्या बॅटमधून असा शॉट आला की प्रेक्षकही थक्क झाले.
जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या शाहिन शाह आफ्रिदीने टाकलेल्या चेंडूवर वॉर्नरने अफलातून शॉट मारला. एखाद्या लहान मुलाच्या गोलंदाजीवर खेळावे अशा पद्धतीने त्याने विकेटच्या मागच्या बाजूला शानदार षटकार ठोकला. पर्थची खेळपट्टी ही जगातील सर्वात उसळत्या खेळपट्टींपैकी एक मानली जाते. अशा ठिकाणी वेगवान गोलंदाजाला असा फटका मारणे हे निव्वळ अशक्यच असल्याचे मानले जाते पण वॉर्नरने ते सहज शक्य करून दाखवले. त्याचा हा शॉट चांगलाच व्हायरल होतोय. पाहा व्हिडीओ-
२१व्या षटकात घडला किस्सा
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पर्थच्या स्टेडियमवर पाकिस्तानला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. उस्मान ख्वाजासोबत वॉर्नरने कांगारूंना चांगली सुरुवात करून दिली. २१व्या षटकात शाहिन गोलंदाजीसाठी आला. शाहीन शाह आफ्रिदीने षटकाचा दुसरा चेंडू टाकला आणि वॉर्नरने अगदी सहज एका पायावर बसून षटकार खेचला. समालोचन करणारा माजी वेगवान गोलंदाज वासिम अक्रमने देखील हा शॉट 'अविश्वसनीय' म्हटले.