PAK vs AUS: कमिन्सचे १० विकेट! पाकिस्तानचा पराभव; २८ वर्षांची परंपरा अन् 'कसोटी' कायम

 Australia vs Pakistan 2nd Test: दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ७९ धावांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 02:16 PM2023-12-29T14:16:19+5:302023-12-29T14:16:59+5:30

whatsapp join usJoin us
Australia vs Pakistan 28-year tradition continues Pat Cummins stars with the ball as Aussies clinch series with 79-run win in second Test | PAK vs AUS: कमिन्सचे १० विकेट! पाकिस्तानचा पराभव; २८ वर्षांची परंपरा अन् 'कसोटी' कायम

PAK vs AUS: कमिन्सचे १० विकेट! पाकिस्तानचा पराभव; २८ वर्षांची परंपरा अन् 'कसोटी' कायम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Australia vs Pakistan | मेलबर्न: २८ वर्षांची परंपरा कायम राखत ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा पाकिस्तानचा दारूण पराभव केला. कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ७९ धावांनी पराभव केला. या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय आहे. मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३१८ आणि दुसऱ्या डावात २६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात २६४ आणि दुसऱ्या डावात २३७ धावा केल्या. खरं तर पाकिस्तानला मागील २८ वर्षांमध्ये एकदाही ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर विजय मिळवता आला नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने १० बळी घेतल्याने त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३१८ धावा केल्या होत्या. यजमान संघाकडून मार्नस लाबूशेनने १५५ चेंडूंचा सामना करत ६३ धावा केल्या. तर, सलामीवीर उस्मान ख्वाजाने ४२ आणि डेव्हिड वॉर्नरने ३८ धावांचे योगदान दिले. मिचेल मार्शने ४१ धावा केल्या. यादरम्यान पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना झमालने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर शाहीन आफ्रिदी, मीर हमजा आणि हसन अली यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. 

पाकिस्तानचा दारूण पराभव 
दरम्यान, पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही शेजाऱ्यांची अवस्था बिकट झाली. पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद २६४ धावा केल्या होत्या. कर्णधार शान मसूदने ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. बाबर आझम या डावात फ्लॉप ठरला. तो केवळ एक धाव करून बाद झाला. तर, मोहम्मद रिझवानने ४२ धावांची आणि सौद शकीलने ६२ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना कर्णधार पॅट कमिन्सने ५ बळी घेतले. याशिवाय नॅथन लायनने चार बळी घेऊन पाकिस्तानच्या फलंदाजीची कंबर मोडली. मिचेल मार्शने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासाठी शानदार फलंदाजी केली. त्याने १३० चेंडूंचा सामना करत ९६ धावा कुटल्या. मार्शने या खेळीत १३ चौकार मारले. तर, लेक्स कॅरी (५३) आणि स्टीव्ह स्मिथ (५०) धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि मीर हमजा यांनी प्रत्येकी ४ बळी घेतले, तर जमालने २ बळी घेतले.

२८ वर्षांची परंपरा कायम! 
पाकिस्तानला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आणि दुसरा सामना जिंकण्यासाठी ३१७ धावांची गरज होती. मात्र, शेजाऱ्यांना सर्वबाद केवळ २३७ धावा करता आल्या. या डावात कर्णधार शान मसूद सर्वाधिक ६० धावा करून बाद झाला. बाबर आझमने ४१ धावांची सावध खेळी केली. तर, रिझवानने ३५ धावांचे योगदान दिले. या मालिकेतील पाकिस्तानी संघाचा सलग दुसरा पराभव झाला अन् २८ वर्षांची परंपरा कायम राहिली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने दुसऱ्या डावातही कमाल केली. त्याने १८ षटकात ४९ धावा देत ५ बळी पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे कमिन्सने दोन्ही डावात ५-५ बळी घेऊन सामनावीर पुरस्कार पटकावला. 

Web Title: Australia vs Pakistan 28-year tradition continues Pat Cummins stars with the ball as Aussies clinch series with 79-run win in second Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.