ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात आज एकाच वेळी दोन सामने सुरू आहेत. एक सामना रावळपिंडी येथे, तर दुसरा न्यूझीलंडच्या Mount Maunganui येथे सुरू आहे. पण, या दोन्ही सामन्याच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील पती-पत्नी मिचेल स्टार्क व अॅलिसा हिली ( Alyssa Healy and Mitchell Starc) एकाच वेळी पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना करताना दिसले. ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यात रावळपिंडी येथे कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस सुरू आहे, तर दुसरीकडे ICC Women's World Cup स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान हा वन डे सामना सुरू आहे. यावेळी मिचेल स्टार्क व अॅलिसा हिली एकाच वेळी फलंदाजी करताना दिसले.
महिला वर्ल्ड कप सामन्यात पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मरूफने १२२ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ७८ धावांची खेळी केली आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानी महिलेने केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. या सामन्यात आलिया रियाझने १०९ चेंडूंत ५३ धावा केल्या. या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने ६ बाद १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर राचिल हायनेस व हिली मैदानावर उतरल्या आहेत आणि दोघींनी पहिल्या दहा षटकांत ६० धावा केल्या आहेत. हायनेस ३४ ,तर हिली २४ धावांवर खेळतेय.
दुसरीकडे पाकिस्तानने ४ बाद ४७६ धावांवर डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियानेही सडेतोड उत्तर दिले. डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची विक्रमी भागीदारी केली. वॉर्नर ६८ धावांवर माघारी परतला. ख्वाजाला शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतावे लागले. त्याने १५९ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने ९७ धावा केल्या. ट्रेव्हिस हेड ( ८) लगेच बाद झाला. मार्नस लाबुशेनने १५८ चेंडूंत १२ चौकारांसह ९० धावांची खेळी केली. स्मिथ ७८, तर कॅमेरून ग्रीन ४८ धावांवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५९ धावा केल्या. मिचेल स्टार्क १३ धावांवर शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर LBW झाला.
मिचेल स्टार्क आणि अॅलिसा हिली हे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारे पहिले कपल आहेत. अॅलिसाचे वडील ग्रेग हे ऑस्टेलियातले प्रथम श्रेणी क्रिकेटर होते. अॅलिसा व मिचेल नऊ वर्षांचे असताना एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान एकमेकांना भेटले होते. दोघांनीही ११ वर्षांखालील संघात यष्टीरक्षणाची जबाबदारीही सांभाळली होती. नंतर सहा वर्षे हे दोघे एकत्र खेळले. यादरम्यान दोघांमध्येही घट्ट मैत्री निर्माण झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. १५ एप्रिल २०१६ मध्ये या दोघांनी लग्न केले.
Web Title: Australia vs Pakistan : Alyssa Healy and Mitchell Starc, Wife and husband are both batting against Pakistan at the same time
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.