दुबई : यंदा टी-२० विश्वचषकात पराभवाचे तोंड न पाहिलेला पाकिस्तान हा एकमेव संघ दुसऱ्या जेतेपदाकडे कूच करीत असतानाच, गुरुवारी येथे रंगणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय नोंदविण्याचा त्यांचा मार्ग सोपा असणार नाही. याचे कारण ॲरोन फिंचचा संघ योग्यवेळी शानदार फॉर्ममध्ये परतला, हे आहे. या मैदानावर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचे पारडे जड राहिले असल्यामुळे, नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरणार आहे.
२०१६ च्या टी-२० विश्वचषकात पहिल्या फेरीत बाहेर पडल्यापासून पाकने यंदा फारच दमदार कामगिरी केली. २००९ चा चॅम्पियन राहिलेल्या बाबर आझमच्या नेतृत्वाखालील या संघाने एकही सामना गमावलेला नाही. उभय संघांदरम्यान मागच्या विश्वचषकात उपांत्य सामना खेळला गेला होता. त्यात माइक हसीच्या शानदार कामगिरीमुळे रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. युएईत सध्याच्या स्पर्धेत मात्र पाक संघ परिस्थितीनुरूप चांगली कामगिरी करीत आहे.
२००९ ला श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट होऊ शकले नाही. त्यामुळे पाकने युएईलाच होम ग्राऊंड बनविले आहे. पीएसएलचे आयोजन देखील येथेच करण्यात आले. भारताला सहज नमविणारा पाकिस्तान संघ विपरित परिस्थितीत न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानवर विजय मिळविण्यात यशस्वी ठरला होता. सर्वाधिक २६४ धावांची खेळी करणाऱ्या बाबरने चार अर्धशतके ठोकली. त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. बाबर- मोहमद हफीज ही सलामीची जोडी अपयशी ठरली तरी, मधल्या फळीत अनेक मॅचविनर आहेत.
षटकार किंग आसिफ अली, अनुभवी शोएब मलिक आणि मोहम्मद हफिज हे धावा काढत आहेत. गोलंदाजांनी देखील फारच प्रभावित केले. वेगवान शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ यांच्यासोबतीला फिरकीपटू इमाद वसीम, मोहम्मद हफिज आणि शादाब खान ही बाबरकडे मुख्य अस्त्रे असतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाबरला हसनकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या संघाकडे जोश हेजलवुड, मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे वेगवान गोलंदाज आणि लेग स्पिनर ॲडम झम्पासारखा तरबेज फिरकीपटू आहे. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि मिशेल मार्श, डावखुरा ॲश्टन एगर यांच्याकडूनही गोलंदाजीत भक्कम साथ मिळू शकते. डेव्हिड वॉर्नर-ॲरोन फिंच ही सलामीची जोडी वेगवान सुरुवात करण्यासाठी ओळखली जाते. मार्श तिसऱ्या, तर स्टीव्ह स्मिथ चौथ्या स्थानावर चांगला खेळ करू शकतो.
लक्ष्य विश्वविजेतेपदाचे
फिरकीपुढे ऑस्ट्रेलिया संघ गोंधळतो. २०१० च्या उपविजेत्या ऑस्ट्रेलियाने वेळेवर मुसंडी मारली. आतापर्यंत ही स्पर्धा जिंकू न शकलेल्या या संघाकडे यावेळी संधी असेल. इंग़्लंडविरुद्ध आठ गड्यांनी झालेला पराभव वगळता फिंचच्या नेतृत्वाखालील संघाने प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजविले. द. आफ्रिकेला नमवून त्यांनी उपांत्य फेरी गाठली.