ICC Women's T20 World Cup, Semi-Final: भारत आणि इंग्लंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. गटातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. इंग्लंडला बसलेल्या या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोटातही तशीच धाकधुक होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीचा सामन्यातही पावसानं खोडा घातला असता तर ऑस्ट्रेलियालाही गाशा गुंडाळावा लागला असता. पण, पावसाने विश्रांती घेतली आणि कांगारुंचा जीव भांड्यात पडला. ऑस्ट्रेलियानं 20 षटकं खेळून काढल्यानंतर पुन्हा पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे ऑसींची कोंडी झाली. मात्र पाऊस थांबल्यानंतर दक्षिण अफ्रिकेसमोर डकवर्थ लुईसनूसार 13 षटकांत 98 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र दक्षिण अफ्रिकेला 13 षटकांत 5 बाद 92 धावा केल्याने ऑस्ट्रेलियाचा 5 धावांनी विजय झाला.
दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. अॅलिसा हिली आणि बेथ मुनी यांना दमदार सलामी देण्यात अपयश आले. हिली ( 18 ) पाचव्या षटकात माघारी परतली. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगनं दुसऱ्या विकेटसाठी मुनीसह संघाचा डाव सावरला. नॅडीने क्लेर्कने ही जोडी तोडली. मुनी ( 28) माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा गडगडला. जेस जॉनासेन ( 1), अॅश्लेघ गार्डनर ( 0) झटपट माघारी परतल्या. पण, एका बाजूनं लॅनिंग खिंड लढवत होती. राचेल हायनेस ( 17) हीला क्लेर्कने बाद करून ऑसींना पाचवा धक्का दिला. क्लेर्कने 19 धावांत तीन फलंदाज बाद केले.
झटपट विकेट गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावांचा वेगही मंदावला. त्यामुळे त्यांना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 134 धावांवर समाधान मानावे लागले. लॅनिंग 49 धावांवर नाबाद राहिली. मात्र पहिल्या इनिंगनंतर पावसाने हजेरी जोरदार हजेरी लावल्यामुळे दक्षिण अफ्रिकेसमोर 13 षटकांत 98 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीच्या षटकांत दक्षिण अफ्रिकेची कर्णधार डेन व्हॅन निकेरक आणि लिझेल लीने सावध खेळ खेळला. मात्र दुसऱ्या षटकांत ऑस्ट्रेलियाची वेगवना गोलंदाज सोफी मोलिनेक्सने लिझेल लीला बाद करत दक्षिण अफ्रिकेला पहिला धक्का दिला. यानंतर डेन व्हॅन निकेरक देखील 12 धावा करत मेगन शूट्टच्या गोलंदाजीवर बाद झाली. तसेच मिग्नॉन डु प्रीज देखील शून्य धावांवर बाद झाली. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला 5 षटकांत 3 बाद 26 धावा करता आल्या.
ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर सुने लुउस आणि लॉरा वोल्वार्ड यांनी संयम खेळी खेळत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मेगन शूट्टने सुने लुउसला 21 धावांवर बाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. लॉरा वोल्वार्डने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र तिला यश मिळवता आले आहे. लॉरा वोल्वार्डने 27 चेंडूत 41 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी गोलंदाजी करताना मेगन शूट्टने 2 विकेट्स, तर जेस जोनासेन, सोफी मोलिनेक्स आणि डेलिसा किमिन्सने प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला पराभूत केल्यानंतर रविवारी 8 मार्चला भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया असा विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला असून त्यांच्या नावावर सर्वाधिक ४ जेतेपद आहेत.