बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022) चे बिगुल वाजले असून पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश या स्पर्धेमध्ये झाला आहे. शुक्रवारी आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाशी भिडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळी करून आपले वर्चस्व राखले मात्र शेवटच्या ५ षटकांमध्ये सामना फिरला आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावा उभारल्या होत्या, ज्यामध्ये फलंदाज शेफाली वर्माने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली.
शेफालीची शानदार खेळीभारताने दिलेल्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारूच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली. कारण केवळ ५५ धावांवर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यामुळे भारताने सामन्यात विजयी सलामी दिलीच असे प्रत्येक भारतीय समर्थकाला वाटत होते. मात्र ऐश गार्डनरने आक्रमक अर्धशतकीय खेळी करून भारताच्या स्वप्नावर पाणी टाकले आणि सामना आपल्या नावावर केला. परंतु सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या विकेटकिपरकडून असे काही झाले ज्याची ऑस्ट्रेलियन संघ अपेक्षा देखील करू शकत नाही. सध्या विकेटकिपर ॲलिसा हेरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
शेफाली वर्मा ताबडतोब फलंदाजी करत होती आणि कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला तिला बाद करायचे होते. कांगारूच्या संघाला याची एक संघी देखील मिळाली मात्र विकेटकिपर ॲलिसा हेरीच्या एका चुकीमुळे ती हुकली. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू शेफालीला फसवून थेट विकेटकिपरच्या हातात गेला. तेव्हा शेफाली मोठा फटकार मारण्यासाठी खेळपट्टीवरून पुढे गेली होती. मात्र तिला स्टंम्पिग करून बाद करण्याची सुवर्णसंधी ॲलिसा हेरीने गमावली.
विकेटकीपरची मोठी चूक व्हायरल खरं तर झाले असे की ॲलिसाने एका हाताने चेंडू पकडला आणि दुसऱ्याच हाताने स्टंप उडवला. ती पुन्हा चेंडू असलेल्या हाताने स्टंप उडवत होती मात्र तेवढ्यात शेफालीला खेळपट्टीवर परतण्यास यश आले. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या विकेटकिपरकडून झालेली ही चूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली असून याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.