लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या महिला टी-२० सामन्यात सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना भारताला २१ धावांनी नमविले. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ८ बाद १७२ धावांची मजल मारल्यानंतर, भारतीयांना २० षटकांत ७ बाद १५१ धावांवर रोखले.
ब्रेब्रॉर्न स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना, भारताला स्मृती मानधना (१) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (१६) यांच्या रूपाने लवकर धक्के बसले. मात्र, शेफाली वर्माने ४१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावांची खेळी करत, भारताच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. तिने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत तिसऱ्या बळीसाठी ७३ धावांची भागीदारी केली. निकोला कॅरीने १४ व्या षटकात शेफालीला बाद केल्यानंतर भारताचा डाव गडगडला. हरमनप्रीतने २७ चेंडूंत ६ चौकारांसह ३७ धावांची झुंज दिली. शेफालीनंतर तिला अपेक्षित साथ मिळाली नाही. डार्सी ब्राऊन आणि ॲश्ले गार्डनर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
त्या आधी भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत, ऑस्ट्रेलियाला दडपणाखाली आणले. मात्र, प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर, एलिसे पेरीने झळकावलेल्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाने आव्हानात्मक मजल मारली. भारतीयांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अलिसा हिली (१), ताहिला मॅकग्रा (१), बेथ मुनी (३०) आणि ॲश्ले गार्डनर (७) यांना झटपट बाद करत, भारताने ऑस्ट्रेलियाची ४ बाद ८९ धावा अशी अवस्था केली. मात्र, पेरीने ग्रेस हॅरिससोबत पाचव्या बळीसाठी ५५ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. हॅरिसने १८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावांचा तडाखा दिला. पेरीने ४७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ७५ धावा कुटल्या. भारताकडून रेणुका सिंग, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा आणि देविका वैद्य यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
धावफलकऑस्ट्रेलिया : २० षटकांत ८ बाद १७२ धावा. (एलिसे पेरी ७५, ग्रेस हॅरिस ४१; बेथ मुनी ३०; देविका वैद्य २/२२, रेणुका सिंग २/२४, अंजली सरवानी २/३४, दीप्ती शर्मा २/४०.) वि. वि. भारत : २० षटकांत ७ बाद १५१ धावा (शेफाली वर्मा ५२, हरमनप्रीत कौर ३७, दीप्ती शर्मा नाबाद २५; डार्सी ब्राऊन २/१९, ॲश्ले गार्डनर २/२१.)