Australia wins the Ashes 2021-22 with 4-0 : ऑस्ट्रेलियानं पाचवी कसोटी १४६ धावांनी जिंकून 'अॅशेस' मालिकेवर ४-० असा कब्जा केला. ऑस्ट्रेलियानं पाचव्या कसोटीत विजयासाठी २७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु इंग्लंडचा संघ १२४ धावांवर गडगडला. बिनबाद ६८ अशा सुस्थितीत असलेल्या इंग्लंडनं पुढील २२ षटकांत ५६ धावांत १० फलंदाज गमावले. त्यामुळे इंग्लंडवर पराभवाचा नामुष्की ओढावली. पॅट कमिन्स, स्कॉट बोलंड आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३०३ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव १८८ धावांवर गडगडला. ट्रॅव्हीस हेड ( १०१) याचे शतक, कॅमेरून ग्रीन ( ७४) व नॅथन लियॉन ( ३१) यांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ३ बाद १२ धावांवरून मोठी मजल मारली. प्रत्युत्तरात इंग्लंड काहीच करू शकला नाही. पॅट कमिन्सनं ४, तर मिचेल स्टार्कनं ३ विकेट्स घेतल्या. ख्रिस वोक्स ( ३६) व जो रुट ( ३४) हे इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले.
ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावातही फार कमाल करता आली नाही. १५५ धावांवर त्यांचा संपूर्ण संघ तंबूत परतला. अलेक्स केरीनं सर्वाधिक ४९ धावा केल्या. इंग्लंडच्या मार्क वूडनं ३७ धावा देताना ६ विकेट्स घेत विक्रमाची नोंद केली. इंग्लंडकडून अॅशेस मालिकेतील ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. स्टुअर्ट ब्रॉडनं ३ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात रोरी बर्न्स व झॅक क्रॅवली यांनी ६८ धावांची सलामी दिली, परंतु त्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. बिनबाद ६८ वरून इंग्लंडचा संपूर्ण संघ १२४ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला मॅन ऑफ दी मॅच आणि मालिकेत सर्वाधिक ३५७ धावा केल्या म्हणून मॅन ऑफ दी सीरिज या पुरस्कारानं गौरविण्यात आले.