- हर्षा भोगलेगेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाने याच कालावधीत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला होता. ती शानदार स्थिती होती. इंग्लंड स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अग्रेसर होता, तर ऑस्ट्रेलिया संघ अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला होता. पण, क्रीडा वर्तुळात वर्षभराचा कालावधी प्रदीर्घ असतो. आता ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरी गाठण्यापासून एक पाऊल दूर आहे. जर ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला तर हा विजय इंग्लंड संघाला अडचणीत आणू शकतो.इंग्लंड संघाला प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्याची आशा होती. प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध ४०० पेक्षा अधिक धावा फटकावण्याची त्यांची तयारी होती. हा संघ विश्वचषक जिंकण्याचा दावेदार होता. जसे आॅस्ट्रेलिया संघ यापूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेत असायचा तसा. पण, ही यंदाची स्पर्धा चकित करणारी ठरली. या स्पर्धेत अनेक पातळीवर खेळाडूंची परीक्षा होते. यात खेळाडूंचा स्टॅमिना आणि बेंच स्ट्रेंथ व परिस्थितीसोबत जुळवून घेण्याच्या क्षमतेची चाचणी होत असते. येथे तुम्हाला अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. येथे तुमची क्षमता व कौशल्य दडपण व तणावाचा सामना करण्यास किती सक्षम आहे, याची चाचणी होते. इंग्लंडलाही याच प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती.
पण, या स्थितीत इंग्लंडला कमी लेखता येणार नाही. जर सांघिक कामगिरी केली तर ही शानदार लढत होईल. पण, त्यांची लढत एका अशा संघासोबत आहे की ज्यांच्या कामगिरीत अलीकडच्या कालावधीत नाट्यमय बदल बघायला मिळाला आहे. वॉर्नर व फिंच शानदार फॉर्मात आहेत. स्टार्क व कमिन्स यांच्या गोलंदाजीमध्ये भेदकता आहे. यापूर्वी संघामध्ये त्याची उणीव होती. संघामध्ये काही कमतरता असेल तर ती म्हणजे स्टार्क व कमिन्स यांच्यानंतर उर्वरित ३० षटकांबाबत आहे. इंग्लंड संघ त्याचा लाभ घेऊ शकतो.इंग्लंड संघाला जेसन रॉयची उणीव भासेल. या संघात नियमितपणे खोलीची उणीव भासत आहे. पण, फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर संघाकडून चमकदार कामगिरीची आशा करता येईल, पण आॅस्ट्रेलियाला पराभूत करणे त्यांच्यासाठी कुठल्याही स्थितीत सोपे ठरणार नाही, असे मला वाटते.