दुबई : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वेस्ट इंडिजवर 3-0 असा दणदणीत विजय मिळवून आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित केले आहे. या कामगिरीसह त्यांनी 2021 साली न्यूझीलंड येथे होणाऱ्या आयसीसी महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित प्रवेश केली. 2021च्या वर्ल्ड कप स्पर्धेत स्थान पक्के करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिलाच संघ ठरला आहे.
महिला अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेतील अव्वल चार संघ थेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. यजमान म्हणून न्यूझीलंडने आपले स्थान आधीच पक्के केले आहे. या गुणतालिकेतील तळाचे तीन संघ वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत बांगलादेश आणि आयर्लंड यांचा सामना करतील. त्याशिवाय आफ्रिका, अमेरिका, आशिया, पूर्व आशिया आणि युरोप विभागातील संघ पात्रता फेरीत सहभागी असतील. त्यांच्यात मुख्य स्पर्धेतील उर्वरित स्थानांसाठी चुरस रंगेल.
ऑस्ट्रेलियाने महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचे जेतेपद पटकावले होते आणि सध्या ते अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी 15 पैकी केवळ एकच सामना गमावला. त्यांच्या खात्यात सध्या 28 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाने या वाटचालीत भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांना पराभूत केले. त्यांना 2017मध्ये इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता.
इंग्लंडच्या खात्यात 24 गुण आहेत, परंतु त्यांनी तीन सामने अधिक खेळले आहेत. भारत आणि दक्षिण आफिक्रा प्रत्येकी 16 गुणांसह तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत, तर पाकिस्तान 15 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्यासाठी प्रत्येक संघाला किमान 28 गुणांची कमाई करावी लागेल. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हे गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहेत. श्रीलंकेला 15 सामन्यांत केवळ एक विजय मिळवता आलेला आहे. त्यामुळे त्यांना पात्रता फेरीतूनच मुख्य फेरीत प्रवेश करण्यासाठी झगडावे लागेल.
Web Title: Australia Women Cricket team become the first team to qualify for the ICC Women's World Cup 2021
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.