Alyssa Healy Harmanpreet Kaur: भारतीय महिला संघाने अलीकडेच मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिन्ही फॉरमॅटमधील सामने खेळले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळवला गेला, ज्यात यजमान टीम इंडियाला विजय मिळवण्यात यश आले. पण, त्यानंतर झालेली वन डे मालिका भारतीय चाहत्यांसाठी एका वाईट स्वप्नासारखी राहिली. कारण तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील एकही सामना जिंकण्यात भारताला यश आले नाही. त्यानंतर झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेत देखील भारताच्या हाती निराशा आली.
पाहुण्या ऑस्ट्रेलियाने वन डे मालिका ३-० ने तर ट्वेंटी-२० मालिका २-१ ने खिशात घातली. या संपूर्ण सामन्यांदरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखली जाणारी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ऑस्ट्रेलियाची कर्णधार ॲलिसा हिली यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. हिली ही ऑस्ट्रेलियाच्या पुरूष संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी आहे.
कसोटी सामन्यात हरमनप्रीतने ॲलिसा हिली फलंदाजी करत असताना तिच्या दिशेने चेंडू फेकून या संघर्षाला सुरूवात केली. तापट स्वभावामुळे चर्चेत असणारी हरमन या सामन्यात तिच्या आक्रमक पवित्र्यामुळे खासकरून चर्चेत होती. भारतीय कर्णधाराचा आक्रमक पवित्रा असला तरी ॲलिसा हिलीने संयमाने घेत कॅप्टन कूल असा अवतार दाखवला.
हिलीचा वादाबद्दल खुलासा कसोटी सामना भारताने जिंकल्यानंतर हिलीने भारतीय खेळाडूंचा फोटो काढून खेळभावना दाखवून दिली. आता ॲलिसा हिलीने हरमनप्रीतबद्दल भाष्य करताना म्हटले, "हरमनप्रीत आणि माझ्यात जे काही चालले होते, ते तणावपूर्ण होते. प्री-गेम किंवा पोस्ट-गेममध्ये जास्त हातमिळवणी होत नव्हती. अखेरचा ट्वेंटी-२० सामना जिंकून मालिका जिंकल्यानंतर आम्ही हस्तांदोलन केले. तेव्हा आमची नजरेला नजर भिडली." ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचे भारताविरूद्ध वर्चस्व कायम आहे. भारताने सलग नवव्यांदा ऑस्ट्रेलियाविरूद्धची ट्वेंटी-२० मालिका गमावली.