सिडनी: कर्णधार विराट कोहलीची ८५ धावांची खेळी अखेर निष्फळ ठरली. मंगळवारी अखेरच्या टी-२० सामन्यात दुसऱ्या टोकाहून इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला ऑस्ट्रेलियाकडून १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सामना गमावला तरीही टी-२० मालिकेत भारतीय संघाने २-१ ने सरशी साधली आहे. दुसरीकडे यजमानांनी देखील विजयासह मालिकेचा शेवट गोड केला. ऑस्ट्रेलियाच्या ५ बाद १८६ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने विराट कोहलीने ८५ धावांची आक्रमक खेळीनंतरही विजयाची संधी गमावली.१८७ धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. ग्लेन मॅक्सवेल टाकत असलेल्या पहिल्याच षटकात लोकेश राहुल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने दुसऱ्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करीत डाव सावरला. विराटने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजी केली. स्वेप्सनने शिखर धवनला बाद केले. संजू सॅमसन देखील लवकर बाद झाला.दरम्यान विराटने एक टोक सांभाळून अर्धशतक गाठले. श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाला. विराटने मात्र हार्दिक पांड्याच्या साथीने फटकेबाजी करीत आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. डॅनिअल सम्सच्या गोलंदाजीवर सुरेख फटकेबाजी करत विराटने सामन्यात रंगत आणली. यानंतर हार्दिक पांड्यानेही रंगात येत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. कर्णधार फिंचने फिरकीपटू ॲडम झम्पाला पाचारण करताच १८ व्या षटकात पांड्याचा बळी घेत झम्पाने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. १९ व्या षटकात ॲन्ड्रयू टायने विराटला बाद करीत भारताच्या आशांवर पाणी फिरवले. ऑस्ट्रेलियाकडून स्वेप्सनने २३ धावात तीन तर मॅक्सवेल एबोट, ॲन्ड्रयू टाय आणि झम्पा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.त्याआधी,भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेताच यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. मॅथ्यू वेडने ५३ चेंडूत ७ चौकार आणि दोन षटकारांसह ८० तसेच मॅक्सवेलने ३६ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. दोघांनी ९० धावांची तसेच वेडने स्मिथसह दुसऱ्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी केली. अखेरच्या नऊ षटकात ९९ धावा निघाल्या. वेडने कारकिर्दीतील दोन्ही अर्धशतके भारताविरुद्ध ठोकली. भारताला खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. दोन झेल सुटले.याशिवाय यष्टिचितची एक संधी गमवाली. वारंवार मिसफिल्डही झाले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २ तर नटराजन आणि शार्दुलने एकेक गडी बाद केला.विराटचा पंचांसोबत ‘राडा’सिडनी: ११व्या षटकात मॅथ्यू वेडला नटराजने टाकलेला चेंडू वेडच्या पायावर आदळताच नटराजन आणि यष्टीरक्षक राहुलने पायचितचे अपील केले.पंचांनी मात्र त्याला नाबाद ठरवले. पंचांच्या निर्णयावर तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यासाठी डीआरएस रिव्ह्यू घेण्याची सुविधा टीम इंडियाकडे उपलब्ध होती. विराट कोहली सीमारेषेवर फिल्डींग करत होता. त्याने धावत येऊन पंचांकडे डीआरएसची मागणी केली. त्याची मागणी आधी मान्य करण्यात आली पण नंतर मात्र ती फेटाळण्यात आली. याचे कारण विचित्र होते. भारताने रिव्ह्यू मागितला त्याआधीच मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर रिप्ले दाखवण्यात आला होता. त्यामुळे विराटला रिव्ह्यू नाकारण्यात आला. यावर विराट पंचांसोबत हुज्जत घालत राहिला. रिप्लेमध्ये वेड पायचित बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते मात्र स्क्रीनवर दाखवल्यामुळे रिव्ह्यू घेतल्याचे मानत पंचांनी निर्णय फेटाळून लावला.
ॲरोन फिंच खूशसिडनी : पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आमचा संघ अखेरच्या लढतीत विजय मिळविण्यात यशस्वी ठरल्यामुळे खूश असल्याचे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरोन फिंच म्हणाला. मालिका चुरशीची झाली. पहिले दोन सामने आम्ही गमावले. आम्ही प्रथमच दोन लेग स्पिनर्सला (ॲडम जम्पा व मिशेल स्वेपसन) संघात स्थान दिले. सीमारेषा छोटी असतानाही त्यांनी धैर्याने मारा केला. त्यामुळे त्यांना श्रेय द्यायलाच हवे, असेही फिंचने सांगितले. फिंच पुढे म्हणाला,‘स्वेपसनने शिखर व विराट यांच्याविरुद्ध सातवे षटक टाकली. जम्पानेही चांगला मारा केला. आम्ही गेल्या १८ महिन्यात मर्यादित षटकांच्या सामन्यांत चांगली कामगिरी केली. मला संघाचा अभिमान आहे.’