साउदम्प्टन : माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथने पुन्हा एकदा मोठी खेळी करताना ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या अनऑफिशीय वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 विकेट राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या 229 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना स्मिथ ( 76) आणि शॉन मार्श ( 55*) यांनी दमदार खेळ केला. मात्र, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर दुखापतग्रस्त झाला. प्रथम फलंदाजी करतान एव्हीन लुईस (50) आणि सुनील अँब्रीस ( 37) हे वगळता विंडीजच्या अन्य फलंदाजांनी निराश केले. आंद्रे रसेलकडून अपेक्षा होत्या, परंतु त्याला अपयश आले. कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रसेलने आयपीएलमध्ये मॅच फिनिशरची भूमिका चोख बजावली. त्याने 14 सामन्यांत 204.81च्या स्ट्राईक रेटने 510 धावा चोपून काढल्या. त्यात त्याने 31 चौकार आणि 52 षटकारांची आतषबाजी केली. आयपीएलच्या या मोसमात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानी होता. गोलंदाजीतही त्याने 11 विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने त्याला वर्ल्ड कप चमूत स्थान दिले. पण, ऑसींचा युवा गोलंदाज अॅडम झम्पाच्या फिरकीसमोर त्याला खेळपट्टीवर फारकाळ टिकता आले नाही. अवघ्या चार चेंडूंचा सामना करून 1 चौकारासह 5 धावांवर तो माघारी परतला. झम्पाने त्याला त्रिफळाचीत केले.लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवर उस्मान ख्वाजाला दुखापत झाली. रसेलच्या गोलंदाजीवर उसळी घेणारा चेंडू ख्वाजाच्या हॅल्मेटवर आदळला आणि त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. अॅरोन फिंच ( 42) याने एका बाजून संयमी खेळ केला. डेव्हिड वॉर्नर 12 धावांवर माघारी परतला. स्मिथने 82 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकार खेचून 76 धावा केल्या. शॉन मार्शने 59 चेंडूंत 7 चौकारांसह नाबाद 55 धावा केल्या.