इंदूर, दि. 24 - भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना वॉर्नर आणि फिंचने ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र आक्रमक फलंदाजी करणारा वॉर्नर 42 धावा काढून हार्दिक पांड्याची शिकार झाला. त्यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अॅरॉन फिंचमध्ये 154 धावांची भागीदारी झाली. पहिल्या दोन सामन्यांत वर्चस्व गाजवाणारे भारतीय गोलंदाज या दोघांपुढे पुरते हतबल दिसले. अॅरोन फिंचने धडाकेबाज शतक झळकावत कांगारुंची धावसंख्या 200 पार पोहोचवली. अखेर 124 धावा काढून कुलदिप यादवच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. सध्या ऑस्ट्रेलियाच्या 40 षटकात केवळ दोन गडी बाद 234 धावा झाल्या असून मोठ्या धावसंख्येकडे त्यांची वाटचाल आहे.
सलग दोन सामने गमावून मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. या सामन्यासाठी भारताने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. मात्र ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात दोन बदल केले असून, सलामीवीर आरोन फिंच आणि यष्टीरक्षक पीटर हॅण्डस्कोंब यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
वेगवान तसेच फिरकी मा-याचा सुरेख संगम साधून पहिले दोन सामने जिंकणा-या भारतीय संघाने येथील होळकर स्टेडियमवर आज रविवारी पुन्हा ऑस्ट्रेलियाला धूळ चारून मालिका विजयासह नंबर वन होण्याचे लक्ष्य आखले आहे.
भारताने चेन्नईत पावसाच्या व्यत्ययात पहिला सामना डकवर्थ-लुईस नियमानुसार २६ धावांनी तसेच कमी धावसंख्या नोंदविल्यानंतर ईडनवर दुसरा सामना ५० धावांनी जिंकल्यानंतर तिस-या सामन्यातही पाहुण्यांना धक्का देत मालिका खिशात घालण्याचा कोहली अॅण्ड कंपनीचा इरादा आहे. होळकर स्टेडियम तसेही भारतासाठी ‘लकी’ आहे. येथे भारताने अद्याप नाणेफेकही गमावली नाही आणि सामनादेखील गमावला नाही.
हवामान मात्र भारताच्या मनसुब्यावर ‘पाणी फेरू’ शकते. येथे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाच्या व्यत्ययाचा अंदाज वगळल्यास सर्वच बाबी भारतासाठी जमेच्या ठरत आहेत. आॅस्ट्रेलिया संघ कधीही मुसंडी मारून मालिकेत चुरस आणू शकतो, हे ध्यानात ठेवूनच आत्ममुग्ध न होता भारतीयांनी लढतीला सामोरे जायला हवे.
होळकर मैदानावर विजय मिळाल्यास वन-डेत भारत पुन्हा नंबर वन बनेल. कसोटीत नंबर वन असलेला भारतीय संघ द. आफ्रिकेपाठोपाठ वन-डेत सध्या दुस-या स्थानावर आहे. दोन्ही संघांचे ११९ गुण असून, भारताने सामना जिंकल्यास १२० गुण होतील. फलंदाजीत भारत संघाचा क्रम सरस आहे. त्याचवेळी गोलंदाजांनी सर्वांचे लक्ष वेधले. वन-डेत प्रथमच भारताकडे गोलंदाजीत इतकी विविधता पाहायला मिळत आहे. भुवनेश्वर, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या हे आॅस्ट्रेलियन फलंदाजांची सारखी परीक्षा घेताना दिसतात. स्टीव्ह स्मिथपुढे चहल आणि कुलदीप यांचे चेंडू खेळून काढणे हीच मुख्य डोकेदुखी आहे. ईडनवर त्याची प्रचिती आली होती. या दोघांना खेळायचे कसे, यावर अद्यापही पाहुण्या फलंदाजांना तोडगा काढता आलेला नाही.
संघ
भारत - भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह,
ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ कर्णधार), डेव्हिड वार्नर, ट्रेव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, पीटर हॅन्डस्कोम्ब, मार्कस् स्टोयनिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, अॅश्टन एगर, नाथन कूल्टर नाईल, केन रिचर्डसन, अॅरोन फिंच,
Web Title: Australia won the toss and bat first
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.