Join us  

आॅस्ट्रेलिया एक विश्वविजेता संघ आहे, हे विसरुन चालणार नाही

बंगळुरूमध्ये आॅस्ट्रेलियाने बाजी मारत भारताची विजयी मालिका खंडित केली. आॅसीच्या विजयातील लक्षवेधी बाब म्हणजे डेव्हिड वॉर्नर - अ‍ॅरोन फिंच यांनी दिलेली द्विशतकी सलामी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 1:06 AM

Open in App

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)बंगळुरूमध्ये आॅस्ट्रेलियाने बाजी मारत भारताची विजयी मालिका खंडित केली. आॅसीच्या विजयातील लक्षवेधी बाब म्हणजे डेव्हिड वॉर्नर - अ‍ॅरोन फिंच यांनी दिलेली द्विशतकी सलामी. अशा शानदार सुरुवातीनंतर जर का एखादा संघ जिंकला नाही, तर त्या संघाला गंभीर टीकेला सामोरे जावे लागेल. पण आॅस्ट्रेलियाने हे होऊ दिले नाही, पण तरी माझ्या मते आॅसीला साडेतीनशेहून अधिक धावा करायच्या होत्या, पण ३३४ देखील विजयासाठी पुरेशा ठरल्या. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, विराट कोहली ज्या क्रमांकावर खेळत होता तेथून त्याला चांगली सुरुवात मिळाली खरी, पण मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. त्याआधी अजिंक्य रहाणे - रोहित शर्मा यांनीही भारताला शतकी सलामी देत चांगली सुरुवात करून दिली. केदार जाधव, हार्दिक पांड्या चांगल्याप्रकारे खेळले. पुढे महेंद्रसिंग धोनी होताच, पण जसजशी धावगती वाढत गेली, तसतसे भारतीयांवर दडपण आले. दरवेळी, तुम्ही जिंकतच राहणार असे नसते. थोडक्यात हा पराभव म्हणजे भारतीयांसाठी एक जाग आणणारा धक्का होता. शेवटी, आॅस्टेÑलिया एक विश्वविजेता संघ आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळे मालिका जरी जिंकली असली, तरी आता पुढील सामन्यात यजमानांना आणखी चांगले खेळावे लागेल.दुसरीकडे, मालिका जिंकल्यानंतर थोडेफार रिलॅक्स झालेल्या भारतीयांमध्ये मला जोश कमी दिसला. त्यामुळे, द्विशतकी भागीदारी झाल्यावर मला याविषयी अधिक शंका आली. पण, जसा खेळ सुरु राहिला ते पाहता या शंका दूर झाल्या आणि भारतीय संघ हा सामनाही जिंकण्यासाठीच खेळत असल्याची खात्री पटली. ३३४ धावांचे आव्हान पार करणे सोपी गोष्ट नाही आणि मोठ्या जिद्दीने भारताने तीनशेहून अधिक धावा केल्या. त्यामुळे भारताने सहजासहजी हार नक्कीच पत्करली नाही. पण मला गोलंदाजीमध्ये कुठेना कुठे भारत कमी पडल्याचे जाणवले. कुलदीप यादव - युझवेंद्र चहल ही जोडी तुटल्याचाही परिणाम जाणवला. वेगवान गोलंदाजांमध्येही हा फरक जाणवला. खासकरून डेथ ओव्हर्समध्ये भुवनेश्वर व बुमराह यांची कमतरता जाणवली, त्यामुळे आॅस्टेÑलियाच्या धावसंख्येला पाहिजे तेवढी मुरड घालता आली नाही. आगामी विश्वचषकासाठी नक्कीच खूप कालावधी आहे, पण त्यादृष्टीने तयारी करताना या सर्व गोष्टींकडेही प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना विचार करावा लागणार आहे. कारण तुम्ही प्रयोग तर करतच राहणार, पण अखेरीस प्रत्येक परिस्थितीमध्ये विजयी होणारा संघ त्यांना तयार करायचा आहे.

टॅग्स :क्रिकेट