ICC ODI World Cup - ऑस्ट्रेलियाची गाडी आता कुठे रुळावर आलेली असताना त्यांना धक्क्यांमागून धक्के बसत आहेत. ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेल हा काल गोल्फ कार्टवरून पडला आणि त्याला कन्कशन नियमामुळे आगामी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यात आणखी एक अष्टपैलू मिचेल मार्श ( Mitch Marsh) वैयक्तिक कारणामुळे तातडीने पर्थसाठी रवाना झाला आहे. तोही इंग्लंडविरुद्धच्या लढतीत खेळणार नाही आणि तो केव्हा परत येईल हेही अद्याप माहीत नाही.
वैयक्तिक कारणांमुळे मार्श गुरुवारी भारतातून मायदेशी रवाना झाला आणि उर्वरित वर्ल्ड कप स्पर्धेसाठी उपखंडात परतण्याची खात्री नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले की, “त्याच्या संघात पुनरागमनाची टाइमलाइन निश्चित केली जाणार आहे.''
गोल्फ कोर्सवर दुखापत झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या शनिवारच्या लढतीत आधीच अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल गमावला आहे आणि मार्शच्या अनुपस्थितीमुळे बाद फेरीतील स्थानाचा पाठलाग करत असताना ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली आहे. संघाचे सदस्य अॅलेक्स कॅरी, सीन अॅबॉट, मार्कस स्टॉइनिस आणि कॅमेरॉन ग्रीन यांच्यापैकी दोघं इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी मॅक्सवेल आणि मार्शच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळतील. फिरकीपटू तनवीर संघा राखीव म्हणून संघासोबत प्रवास करत आहे.
मार्शने वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतल्यात ऑस्ट्रेलियाकडे दुसरे पर्यात आहेत, परंतु सर्व बदली खेळाडूंना स्पर्धेच्या तांत्रिक समितीने मान्यता देणे आवश्यक आहे. मार्शने आतापर्यंत या वर्ल्ड कपमध्ये एकूण २२५ धावा केल्या आहेत आणि २ विकेट्स घेतल्या आहेत. बंगळुरूमध्ये पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना त्याने शानदार १२१ धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरीचे गणित ऑस्ट्रेलियाला उर्वरित तीन सामन्यांत इंग्लंड, अफगाणिस्तान व बांगलादेश यांचा सामना करायचा आहे आणि हे तिन्ही सामने जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांनी २ विजय मिळवल्यास नेट रन रेटची भूमिका महत्त्वाची ठरेल.