बिग बॅश लीग-11 च्या 12व्या सामन्यात पर्थ स्कॉचर्सने होबार्ट हरिकेन्सवर एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पर्थने 182 धावा ठोकल्या तर प्रत्युत्तरात होबार्ट हरिकेन्स अवघ्या 129 धावांवर आटोपला. पर्थने हा सामना 53 धावांनी जिंकला आणि शतक झळकावणाऱ्या मिचेल मार्शला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यात मिचेल मार्शची फटकेबाजी पाहायला मिळाली, पण या सामन्यादरम्यानच एक अपघात झाला.
होबार्ट हरिकेन्सचा फलंदाज बेन मॅकडर्मोच्या षटकाराने एका चाहत्याला गंभीर जखमी केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हॉबार्ट हरिकेन्सच्या डावाच्या 7व्या षटकात मॅकडर्मोने गोलंदाज अँड्र्यू टायच्या चेंडूवर शानदार हवाई शॉट खेळला. चेंडू थेट मिडविकेटच्या सीमारेषेकडे गेला.
यादरम्यान, प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका चाहत्याने तो चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पण प्रयत्न फसला आणि चेंडू थेट चाहत्याच्या नाकावर लागला. यानंतर त्या चाहत्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. पण, लगेच तिथे सुरक्षारक्षक पोहोचला आणि त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे नेले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
होबार्टचा दणदणीत पराभव
होबार्ट हरिकेन्सचा फलंदाज मॅकडर्मोने 41 धावांची धडाकेबाज खेळी खेळली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मॅकडर्मो व्यतिरिक्त, डार्सी शॉर्टने 31 धावा केल्या, तर कर्णधार मॅथ्यू वेड 4 धावा करून बाद झाला. पीटर हँड्सकॉम्बलाही केवळ 3 धावा करता आल्या. लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला टीम डेव्हिडही 17 धावा करून बाद झाला. पर्थ स्कॉचर्सच्या गोलंदाजांनी होबार्टला मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टिमल मिल्सने 4 षटकात केवळ 23 धावा देत 3 बळी घेतले. अॅश्टन अगर आणि अँड्र्यू टायनेही 2-2 विकेट घेतल्याने होबार्टचा संघ 19 षटकांत गारद झाला.
मिचेल मार्शने धडाकेबाज शतक ठोकले
तत्पूर्वी, मिचेल मार्शने होबार्टच्या मैदानावर यजमानांची जोरदार धुलाई केली. मार्शने 60 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. या उजव्या हाताच्या अष्टपैलू खेळाडूने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 5 षटकार मारले. मार्शने बिग बॅश लीगमध्ये प्रथमच शतक झळकावले असून या मोसमात त्याचा हा पहिलाच सामना होता. मार्शशिवाय लॉरी इव्हान्सनेही 24 चेंडूत 40 धावांची जलद खेळी करत संघाची धावसंख्या 182 धावांवर नेली.