सिडनी : क्रिकेटला काळीमा फासणारे कृत्य केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पण ही कारवाई होण्यापूर्वीच लेहमन यांनी आपले पद सोडले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर लेहमन आपले पद सोडणार आहेत. याप्रकरणी लेहमन हे निर्दोष आहेत आणि त्यांच्यावर कोणताही कारवाई होणार नाही, असे म्हटले जात होते.
याबाबत लेहमन म्हणाले की, " जो काही प्रकार घडला तो गंभीर आहे. एक प्रशिक्षक म्हणून हे कृत्य घडू नये, ही माझीही जबाबदारी होती. या कृत्यामुळे सारेच चाहते दुखावले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघाने जे काही केले त्यामध्ये मीदेखील दोषी आहे. आता चाहत्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे, हे क्रिकेट ऑस्ट्रेलियापुढे मोठे आव्हान असेल. "
लेहमन यांनी आतापर्यंत बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवून दिले आहे. खेळाडूंसाठी मित्र, फिलॉसॉफर आणि गाईड, अशी लेहमन यांची ओळख होती. ऑस्ट्रेलियाने जेव्हा 2015 साली विश्वचषक जिंकला तेव्हा लेहमन हेच संघाचे प्रशिक्षक होते. यावेळी लेहमन यांनी खेळाडूंकडून तंत्र चांगलेच घोटवून घेतले होते. जेतेपद पटकावल्यावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी लेहमन यांना चक्क बीअरने आंघोळ घातली होती.
सारे काही आलबेल सुरु होते. त्यामुळे 2019 साली होणाऱ्या अॅशेस मालिकेनंतर आपण प्रशिक्षकपद सोडणार, असे लेहमन यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. पण दक्षिण आफ्रिकेत घडलेल्या चेंडूच्या छेडछाडीमुळे लेहमन हे व्यथित झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी आपण चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच हे पद सोडणार असल्याचे खासगीत म्हटले होते. याबाबतचे वृत्त इंग्लंडमधील 'डेली टेलिग्राफ'ने दिले होते.