Cameron Green Kidney disease : आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन आजारामुळे त्रस्त आहे. लहानपणापासूनच त्याच्या एका किडनीच्या नळीमध्ये काही समस्या आहे, त्यामुळे मूत्र पूर्णपणे किडनीतून बाहेर पडू शकत नाही. कॅमेरून ग्रीनने सांगितले की, त्याला या आजाराची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, परंतु नुकत्याच केलेल्या अल्ट्रासाऊंडमध्ये त्याच्या किडनीशी जोडलेल्या लघवीच्या नळीचा वॉल्व नीट उघडत नसल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे लघवी नीट खाली जाऊ शकत नाही.
दरम्यान, किडनीच्या समस्येमुळे ग्रीन आगामी आयपीएल हंगामाला मुकणार असल्याची चर्चा आहे. आयपीएल २०२४ साठी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा भाग आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट वेबसाईट '७ क्रिकेट'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "माझ्या आई-वडिलांनी मला सांगितले की, माझा जन्म झाला तेव्हापासूनच मला मूत्रपिंडाचा जुनाट आजार आहे, त्याची कोणतीही लक्षणे नव्हती. पण हे नुकतेच अल्ट्रासाऊंडमध्ये उघड झाले आहे.
ग्रीनच्या आजाराबद्दल बोलताना त्याची आई बी ट्रेसी यांनी म्हटले, "ही समस्या लघवीच्या अडथळ्याशी संबंधित आहे. त्याच्या मूत्रमार्गाच्या वॉल्वमध्ये अडथळा आहे, ज्यामुळे मूत्र मूत्रपिंडात परत येते आणि ते योग्यरित्या विकसित झालेले नाही. त्यामुळे ही एक गंभीर बाब आहे. या चाचणीनंतर ग्रीनला या समस्येवर उपचार मिळू शकतात आणि शक्यतो डॉक्टर त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत त्याला काही काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागू शकते.
ग्रीन बंगळुरूच्या ताफ्यात सध्या ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात पाकिस्तानविरूद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मात्र, पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये ग्रीनला संधी मिळाली नाही. आयपीएल २०२४ साठी कॅमेरून ग्रीन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ताफ्यात आहे, मुंबई इंडियन्सला १७.५ कोटी रूपये देऊन बंगळुरूच्या फ्रँचायझीने ग्रीनला आपल्या संघात घेतले. याआधी मुंबईने आयपीएल २०२३ च्या लिलावात या अष्टपैलू खेळाडूला खरेदी केले होते. आयपीएलच्या मागील हंगामातून पदार्पण करणाऱ्या ग्रीनने १६ सामन्यात ४५२ धावा केल्या ज्यात १ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.