David Warner Retirement: ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. २०२४ मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा ही आपली शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असणार असल्याचे संकेत देताना विजयाने निरोप घेण्याचा निर्धार त्याने बोलून दाखवला. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी भारतात येणार आहे. वॉर्नर म्हणाला, 'माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे शेवटचे वर्ष असण्याची शक्यता आहे. माझी नजर २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर आहे, त्यामुळे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये विजेतेपद मिळवणे हे महत्त्वाचे असणार आहे.
२०२१ मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता आणि या स्पर्धेत सर्वाधिक २८९ धावा केल्याबद्दल वॉर्नरला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरविण्यात आले होते. तो सध्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्सकडून खेळत आहे. तो म्हणाला, 'मी या वर्षासाठी आणि पुढील वर्षासाठी थंडर्सशी करार केला आहे. माझ्याकडे आता बिग बॅश लीगमध्ये खेळण्यासाठी वेळ आहे आणि हे कदाचित माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचे शेवटचे वर्ष असेल.''
वॉर्नरने मात्र इंडियन प्रीमियर लीग खेळणार की नाही याबाबत काहीही सांगितले नाही. वॉर्नर सध्या दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य आहे आणि रिषभ पंत कार अपघातात जखमी झाल्यामुळे दिल्लीचे कर्णधारपद वॉर्नरकडे येण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार, ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.
बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेला नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
- 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
- 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
- 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला
- 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका
- 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई
- 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
- 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"