नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर मैदानात असो वा बाहेर त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. तो नेहमी मजेशीर व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. वॉर्नरने आता देखील एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये डेव्हिड वॉर्नरने अभिनेत्याच्या चेहऱ्याच्या जागी स्वतःचा चेहरा लावला आहे.
दरम्यान, यावेळी डेव्हिड वॉर्नरने साऊथमधील लोकप्रिय अभिनेता विक्रमच्या चेहऱ्याच्या जागी आपला चेहरा लावला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूने विक्रमच्या लोकप्रिय चित्रपट 'आय' मधील एक दृश्य पोस्ट केले ज्यामध्ये तो काही कुस्तीपटूंशी लढताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये वॉर्नरने विक्रमच्या चेहऱ्याच्या जागी स्वत:चा चेहरा लावला असून तो स्वत: त्या लोकांशी लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच त्याने चाहत्यांना चित्रपटाचे नाव ओळखण्यास सांगितले आहे.
वॉर्नरने शेअर केला मजेशीर व्हिडीओवॉर्नरने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले, "माझ्या आवडीपैकी एक, चित्रपटाचे नाव सांगा?". चाहत्यांना उत्तर देताना फारशी अडचण आली नाही आणि त्यांनी सहज चित्रपटाचे नाव सांगितले. एका चाहत्याने तर ऑस्कर नामांकन येत असल्याची कमेंटही केली.
भारत दौऱ्यावर आलेल्या डेव्हिड वॉर्नरला कसोटी मालिकेच्या मध्यावर मायदेशी परतावे लागले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो खेळला होता पण दुसऱ्या कसोटीत दुखापत झाल्यामुळे तो बाहेर पडला होता. त्याने खेळलेल्या तीन डावांत त्याला खास कामगिरी करता आली नाही. त्याने तीन डावात एकूण केवळ 26 धावा केल्या. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या संघातील स्थानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, आता तो 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेत भारतीय संघाशी भिडणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना 1 मार्चपासून खेळवला जाणार आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"