Michael Clarke Girlfriend: ऑस्ट्रेलिया हा क्रिकेट विश्वातील एक बलाढ्य संघ मानला जातो. वन डे विश्वचषकातील सर्वाधिक विश्वचषक त्यांच्याच नावावर आहेत. २०१५ साली झालेल्या घरच्या मैदानावरील वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने कर्णधार मायकल क्लार्क याच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. पण आता तो एका विचित्र प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच क्लार्कचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रो हिने त्याला बेदम हाणल्याचे दिसले. त्यानंतर आता चप्पल कंपनीने देखील क्लार्कला मोठा दणका दिला आहे.
गर्लफ्रेंडने का केली मारहाण?
मायकल क्लार्क आणि त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रो यांच्यात जे घडलं त्याचा नेमका प्रकार काय घडला हे सविस्तर समजू शकले नव्हते. पण एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये जेड यारब्रोने क्लार्कला बेदम मारले. यारब्रोने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर चप्पल निर्मिती करणाऱ्या कंपनीनेही त्याला चांगलाच धक्का दिला.
चप्पल बनवणाऱ्या कंपनीने काय केले?
शूज आणि चप्पल बनवणाऱ्या ऑस्ट्रेलियन कंपनीने क्लार्क सोबत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. चप्पल आणि कपडे निर्मिती करण्याचा व्यवसायातील मोठे नाव असलेल्या एका प्रमुख ब्रँडने क्लार्कपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन ब्रँडने पुष्टी केली आहे की तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ते क्लार्कसोबत काम करण्याची शक्यता नाही. ऑस्ट्रेलियाच्या सुप्रसिद्ध ब्रँडने सांगितले की, क्लार्कशी त्यांचे नाते गेल्या वर्षी सुरू झाले आणि ते गेल्या वर्षीच संपले आणि आता या वादानंतर हे नाते पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. प्रेयसीकडून झालेल्या मारहाणीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या अडचणीत वाढ झाली. त्याची प्रतिमा खराब झाली आणि आता त्याचे करोडोंचे नुकसान झाले.
दरम्यान, त्या ब्रँडने क्लार्कसोबत फक्त एकदाच काम केले. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीला त्याच्यासोबत 'फादर्स डे' शूट केले होते, असे निवेदनात म्हटले आहे. आता हा ब्रँड भविष्यात पुन्हा कधीही क्लार्कसोबत काम करणार नाही. त्यामुळे भविष्यात क्लार्कचा या ब्रँडसोबत करोडोंचा करार होण्याची शक्यताही संपुष्टात आली आहे.
BCCI देखील क्लार्कला धक्का देणार?
क्लार्कला भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या कॉमेंट्री पॅनलमधूनही वगळले जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत. बीसीसीआयने कॉमेंट्री पॅनलसाठी माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराशी करार केला होता, परंतु आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोर्डाने त्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या २०२३ च्या भारत दौऱ्यात मार्क वॉ, मिचेल जॉन्सन आणि एरॉन फिंच समालोचक म्हणून मायकेल क्लार्कची जागा घेतील. असे झाल्यास क्लार्कला सुमारे 82 लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते.