नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली. त्याचे हे काळे कृत्य जगासमोर आणले ते ऑस्कर या कॅमेरामनने. ऑस्करचे यावेळी भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या खास शैलीत कौतुक केले आहे.
बेनक्रॉफ्टने केलेल्या कृत्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने क्रिकेटला काळीमा फासली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उचलबांगडी केली आहे. त्याचबरोबर आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे, त्याचबरोबर त्याच्या मानधनातील 100 टक्के रक्कम दंड स्वरुपात कापली जाणार आहे.
ऑस्करने मैदानात जे काम केले त्यामुळे साऱ्यांना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केलेले कृत्य समजू शकले. त्यामुळे सेहवागने त्याचे बॉलीवूडमधील ' डॉन ' चित्रपटातील एका डॉयलॉगने कौतुक केले आहे. सेहवागने आपल्या ट्विटरवर ऑस्करचा फोटो टाकला आणि म्हटले आहे की, " गौर से देखिए इस शख्स को। ऑस्कर- द कैमरामैन, इनके कैमरे से बचना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। "
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने नेमके केले तरी कायकेप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. पंच जवळ येत असतानाच बेनक्राफ्ट याने आपल्या अंतवस्त्रात एक छोटी पिवळी वस्तु लपवली. जेव्हा पंचांनी त्याला विचारले. तेव्हा पँटमध्ये हात टाकून त्याने ती वस्तु दाखवली. चष्मा साफ करण्याच्या मऊ कपड्यासारखी ती होती. बेनक्राफ्ट याने पत्रकार परिषदेत मान्य केले की तो टेपने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करत होता.