India vs Australia : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन फॅन्सनं वर्णद्वेषी शेरेबाजी करून भारतीय खेळाडूंचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. गॅबा कसोटीतही तशाच प्रकारानं क्रिकेटचे वातावरण गढुळ झाले. भारतीय खेळाडूंनी या शेरेबाजीला भीक घातली नाही आणि मैदानावरील कामगिरीनं सर्वांची बोलती बंद केली. १९८८नंतर ऑस्ट्रेलियाला गॅबावर हार मानावी लागली. ऑस्ट्रेलियाने ठेवलेले ३२८ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३ विकेट्स राखून सहज पार केले. या ऐतिहासिक विजयानंतर ऑसी फॅन्सनेही वंदे मातरम् आणि भारत माता की जय, असा जयघोष केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने ३२ वर्षांत पराभव बघितलेला नाही. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये सलग २८ कसोटी सामने सहज जिंकले. अशा फुशारक्या मारणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय युवा ब्रिगेडने जबरदस्त हादरा दिला. अनुभवी आणि प्रमुख खेळाडू जखमी असताना नवख्या चहेऱ्यांनी जिद्दी खेळ करीत ऑस्ट्रेलियाचे ‘गर्वाचे घर खाली’ केले. भारतानं ही कसोटी मालिका २-१ अशा फरकाने खिशात घातली.
गॅबा मैदानावर आतापर्यंत २५० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य कोणत्याही संघाला गाठता आले नव्हते. १९५१ मध्ये वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे २३६ धावांचे लक्ष्य गाठले होते. मात्र, भारतीय संघाने मंगळवारी ऐतिहासिक विजयासह वेस्ट इंडिजचा ७० वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा दौरा आतापर्यंतचा सर्वांत खडतर दौरा असल्याचे सांगितले. ते म्हणाले,‘हा सर्वांत खडतर दौरा होता. यापेक्षा सरस काहीच नाही. ३६ धावांत बाद झाल्यानंतर हे सर्व अवास्तविक भासत आहे. पराभव मानने आमच्या शब्दकोषात नाही.’
या विजयानंतर सोशल मीडियावर ऑसी फॅनचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.