IPL 2024 Updates: सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. आयपीएल २०२४ चा हंगाम संपल्यानंतर ट्वेंटी-२० विश्वचषक पार पडणार आहे. या वर्षीच्या अखेरीस भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. २२ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची मालिका खेळवली जाईल. आयपीएलच्या लिलावात कोणीही खरेदीदार न मिळालेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्टीव्ह स्मिथ सध्या समालोचन करत आहे. तो भारताविरूद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा हिस्सा असेल असे अपेक्षित आहे. अशातच त्याने आयपीएलमध्ये आपल्या गतीने भल्या भल्या फलंदाजांना चीतपट करणाऱ्या मयंक यादवचे कौतुक करताना एक मोठे विधान केले. (IPL 2024 News) स्मिथ आयपीएल २०२४ चा हिस्सा नसला तरी समालोचनाच्या माध्यमातून तो या स्पर्धेचा भाग आहे. लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळणाऱ्या मयंक यादवने आपल्या गतीने सर्वांना प्रभावित केले. मयंक यादव आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक वेगाने चेंडू फेकणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात विक्रमी कामगिरी करताना १५६.७ किमी प्रति ताशी वेगाने चेंडू फेकला.
मयंक यादवचे कौतुकयुवा मयंक यादवचे कौतुक करताना स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेत मयंक यादवला संधी मिळायला हवी. मला त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजी करायची आहे. स्मिथ 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलत होता. लखनौच्या मयंकने आरसीबीविरूद्धच्या सामन्यात ३ बळी घेतले, यामध्ये दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश होता. त्याने ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीन यांना बाहेरचा रस्ता दाखवला. खरं तर मयंक दुखापतीमुळे मागील हंगामात खेळू शकला नव्हता. पण, त्याला या हंगामातून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याला त्याच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय तो पर्पल कॅपच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
IND vs AUS कसोटी मालिका -
- पहिला कसोटी सामना - २२ ते २६ नोव्हेंबर - पर्थ
- दुसरा कसोटी सामना - ६ ते १० डिसेंबर - ॲडिलेड
- तिसरा कसोटी सामना - १४ ते १८ डिसेंबर - ब्रिस्बेन
- चौथा कसोटी सामना - २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न
- पाचवा कसोटी सामना - ३ ते ७ जानेवारी - सिडनी