मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेला दोन दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. पण ही मालिका सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने इतिहास रचल्याचे समोर आले आहे.
भारतानं 2020मधील पहिल्याच मालिकेत श्रीलंकेला नमवून नववर्षाची दणक्यात सुरुवात केली. पुण्यात झालेल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत भारतानं 78 धावांनी विजय मिळवताना मालिका 2-0 अशी खिशात घातली. आता टीम इंडियाला तगड्या ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातली तीन वन डे सामन्यांची मालिका 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना होणार आहे. टीम इंडियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवणे सोपं नक्की नसेल आणि याची जाण कांगारुंना आहे.
टीम इंडिया जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती, तेव्हा संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे महत्त्वाचे खेळाडू नव्हते. पण, या मालिकेत ते टीम इंडियासमोर कडवे आव्हान उभ करण्यासाठी सज्ज आहेत. एक वर्षांच्या बंदीनंतर स्मिथ आणि वॉर्नर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कमबॅक केले. स्मिथनं अॅशेस मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. वॉर्नरनं इंडियन प्रीमिअर लीगनंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत उल्लेखनीय खेळी केली. त्यामुळे टीम इंडियासमोर हे दोन फलंदाज कडवे आव्हान उभे करू शकतात.
सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश क्रिकेट लीग सुरु आहे. या लीगमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसने इतिहास रचल्याचे समोर आले आहे. कारण या लीगमध्ये सर्वाधिक धावांची खेळी त्याने साकारली आहे. स्टॉइनिसने ६० चेंडूंमध्ये १० चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर शतक साजरे केले होते. त्याचबरोबर त्याने ७९ चेंडूंत १४७ धावांची सर्वाधिक खेळी साकारली, यामध्ये १३ चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. यापूर्वी या लीगमध्ये डॉर्सी शॉर्टने नाबाद १२२ धावांची खेळी केली होती. स्टॉइनिसने आता हा विक्रम मोडीत काढला आहे.
दोन्ही संघ
ऑस्ट्रेलिया - अॅरोन फिंच ( कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स करी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लॅबुश्चॅग्ने, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर, अॅडम झम्पा.
भारत - विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह
वेळापत्रक14 जानेवारी - मुंबई17 जानेवारी - राजकोट19 जानेवारी - बंगळुरू