Join us  

AUS vs SA: मुंबई इंडियन्सच्या 'कॅमेरून ग्रीन'समोर दक्षिण आफ्रिका गारद; 5 बळी घेत दिला मोठा धक्का

सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 12:10 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. आजपासून या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत कांगारूच्या गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली. अलीकडेच पार पडलेल्या आयपीएलच्या मिनी लिलावात मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनने आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. खरं तर 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने आघाडी घेतली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 5 बळी पटकावले. मिचेल स्टार्कने 1 बळी घेतला तर स्कॉट बोलंड आणि नॅथन लायन यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. दक्षिण आफ्रिकेकडून कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मात्र, काइल व्हेरेने (52) आणि मार्को जॅन्सन (59) धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु या दोघांनाही कॅमेरून ग्रीनने बाद करून दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या पहिल्या डावात 68.4 षटकांत 189 धावांवर सर्वबाद झाला. 

कॅमेरून ग्रीन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 च्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला 17.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. कॅमेरून ग्रीन अत्यंत स्फोटक फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीत माहिर आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला असताना कॅमेरून ग्रीनने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना चकीत केले होते.

दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड. 

दुसऱ्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - डीन एल्गर (कर्णधार), सारेल एरवी, थेउनिस डे ब्रुन, टेम्बा बवुमा, खाया झोंडो, काइल व्हेरेने (यष्टीरक्षक), मार्को जॅन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्तजे, लुंगी एनगिडी.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :आॅस्ट्रेलियाद. आफ्रिकामुंबई इंडियन्सआयपीएल लिलावआयपीएल २०२२
Open in App