WTC Point Table 2025 - ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडवर क्लीन स्वीप मिळवून भारतीय संघाचा ताण वाढवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील कसोटी टीम इंडियाने इंग्लंडचा ४-१ ने पराभव केला आणि २०२३-२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान न्यूझीलंडचा २-० असा सूपडा साफ केला आणि टीम इंडियाचा ताप वाढवला आहे. या पराभवामुळे न्यूझीलंड संघाने केवळ अव्वल स्थान गमावले नाही, तर त्यांचा संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीचा निकाल पाहुण्यांच्या बाजूने लागला. विजयासाठी २७९ धावांचे लक्ष्य समोर असलेल्या कांगारूंना पाचव्या दिवशी २०२ धावा करायच्या होत्या, तर न्यूझीलंडला ६ विकेट्सची गरज होती. पण, ८० धावांत ५ विकेट्स गमावलेल्या ऑस्ट्रेलियन संघासाठी मिचेल मार्श ( ८० धावा) आणि ॲलेक्स कॅरी ( नाबाद ९८ धावा) यांनी धावून आले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी करून सामन्याचे चित्र फिरवले. ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सच्या मोबदल्यात २७९ धावांचे लक्ष्य गाठले आणि तीन विकेट्सने दणदणीत विजय मिळवत मालिका २-० अशी संपवली.
या निकालानंतर WTC 2023-25 गुणतालिकेतीवर नजर टाकल्यास, टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडला पराभूत केल्यानंतर ६८.५१ च्या विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे. किवींविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विजय मिळवण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाची विजयाची टक्केवारी ५९ होती, परंतु आता ती ६२.५० झाली आहे. यासह ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला दुसऱ्या स्थानावरून मागे ढकलून भारताच्या जवळ पोहोचले आहेत. भारत पहिल्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाचे अव्वल स्थान मिळविण्याचे टेन्शन वाढवले आहे. न्यूझीलंडनंतर ( ५० टक्के) बांगलादेश ( ५०) चौथ्या स्थानावर आहे आणि पाकिस्तान ३६.६६ विजयाच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे.