IND vs AUS ODI । मुंबई : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची मालिका गमावल्यानंतर कांगारूच्या संघाचे पुढील लक्ष्य वन डे मालिकेवर असणार आहे. ही मालिका 17 मार्चपासून (IND vs AUS 1st ODI) मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे. वन डे मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर मुंबईत गल्ली क्रिकेटचा आनंद घेताना दिसला. डेव्हिड वॉर्नर मुंबईच्या रस्त्यांवर गल्ली क्रिकेटचा आनंद लुटतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे वॉर्नर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील अखेरच्या 2 सामन्यांतून बाहेर झाला होता. आता तो वन डे मालिकेसाठी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघाशी जोडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी डेव्हिड वॉर्नर आगामी मालिका खेळण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.
वॉर्नरला गल्ली क्रिकेटची भुरळबुधवारी वॉर्नरने मुंबईच्या रस्त्यावर 'गली क्रिकेट' खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला, जिथे तो भारतीय चाहत्यांसोबत क्रिकेटचा आनंद घेताना दिसला. व्हिडीओ शेअर करताना वॉर्नरने कॅप्शन दिले की, "हिट करण्यासाठी एक शांत रस्ता सापडला आहे."
दुखापत होण्यापूर्वी देखील वॉर्नर धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसला. वॉर्नरने नागपुरातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटीत 1 आणि 10 धावा केल्या. तर नवी दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला, जिथे त्याने पहिल्या डावात केवळ 15 धावा केल्या. अलीकडेच ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी वॉर्नर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा हिस्सा असेल असे संकेत दिले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"