- अयाझ मेमन या मालिकेतील पराभव भारतासाठी मोठा धक्का आहे. भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. तरीही भारताला मालिकेत पराभव पत्करावा लागला. ही बाब सांगते की, भारत हा तितका मजबूत संघ नाही जितका तो समजला जात होता.ही मालिका मायदेशात झाली. त्यामुळे त्यात भारताने किमान ४ -१ असा विजय मिळवायला हवा होता. मात्र, तसे झाले नाही. भारतीय संघ व्यवस्थापन ज्या प्रश्नांची उत्तरे शोधत होते; तिथे उत्तरे मिळण्याऐवजी आणखी प्रश्न निर्माण झाले आहेत. आता भारतीय संघाला एकदिवसीय सामने नाहीत. आयपीएलनंतर थेट विश्वचषक स्पर्धा होईल.भारतीय संघात आता फारसे बदल होणार नाही. १५ पैकी १० ते १२ खेळाडूंची जागा नक्की आहे. आता मोठे फेरबदल करण्यास वेळ नाही. तीन ते चार खेळाडू बदलले जाऊ शकतात. मात्र, पर्याय म्हणून जे खेळाडू आहेत, ते देखील फॉर्ममध्ये नाहीत. चहलने ज्या पद्धतीने धावा दिल्या, त्यामुळे जडेजाला तिसरा फिरकीपटू म्हणून न्यावे लागेल. तसे केल्यास एक अष्टपैलू खेळाडू कमी होऊ शकतो. तसेच विश्वचषकाची निवड करताना दिनेश कार्तिक आणि अजिंक्य रहाणे यांचाही विचार केला जावा. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला चांगला संघ निवडता यावा. कदाचित नव्या चेहऱ्यालादेखील संधी मिळू शकते. इंग्लंडमध्ये वातावरण सातत्याने बदलत असल्याने चेंडू स्विंग होतो, त्यामुळे तेथे फलंदाजाला अनुभवाची गरज असते.आॅस्ट्रेलियन संघात वॉर्नर व स्मिथ यांचे पुनरागमन झाले आहे. हे इतर संघांना थेट आव्हान आहे. आॅस्ट्रेलियन संघ गतविजेता आहे. त्यामुळे या संघाला कमी लेखता येणार नाही. गेल्या काही वर्षांत त्यांच्या कामगिरीचा आलेख खालावला आहे. वॉर्नर आणि स्मिथ यांचा फॉर्म कसा आहे हे बघावा लागेल.भारतात आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांचे विशेष कौतुक करावे लागेल. अॅडम झम्पा याने भारतीय फिरकीपटूंपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली. मिशेल स्टार्क, हेझलवुड यांचा संघात समावेश झाला तर आॅस्ट्रेलियन संघ नक्कीच मजबूत बनतो.भारतीय खेळाडूंना विराट कोहलीने आयपीएलमधील खेळाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, आयपीएलपेक्षा मोठी स्पर्धा आहे विश्वचषक. त्यामुळे भारतीय संघातील संभाव्य खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळताना आपल्या शरीराचा विचार करावा, असा सल्ला विराटने दिला आहे. जलदगती गोलंदाजांना दुखापत झाल्यास भारतीय संघाच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले जाईल.
(लेखक संपादकीय सल्लागार आहेत)