केपटाऊन : चेंडूशी छेडछाडीमुळं क्रिकेटविश्व ढवळून निघालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेनं या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 322 धावांनी पराभव केला आहे. या निर्णायक विजयासाह चार कसोटी सामन्याच्या मालिकेत 2-1 अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 430 धावांचे आव्हान ठेवलं होतं. पण या डोंगरा या आव्हानापुढं आणि चेंडूच्या छेडछाडीच्या आरोपामुळं दबावात गेलेला ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 107 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन गोलंदाजीसमोर अक्षरश: लोटांगण घातलं. दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्केलनं 23 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर केशव महाराजनं दोन विकेट्स घेतल्या.
तिसऱ्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 311 तर दुसऱ्या डावात 373 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 255 आणि दुसऱ्या डावात फक्त 107 धावा केल्या. परिणामी या वादग्रस्त सामव्यात ऑस्ट्रेलियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील दोन्ही डावात 9 बळी घेणाऱ्या मॉर्ने मॉर्कलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना हा चेंडूला केलेल्या छेडछाडीमुळं गाजला. केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनितीचाच असल्याचे मान्य केले आहे. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली आहे. चेंडूशी छेडछाड केल्याची कबुली शनिवारी दिल्यानंतर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेविड वॉर्नर यांना क्रिकेट आॅस्ट्रेलियाने रविवारी आपापल्या पदांवरून दूर केले आहे. तर यष्टिरक्षक फलंदाज टीम पेन हा संघाचा हंगामी कर्णधार असेल.