इंग्लंडने मायदेशात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ४-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. विशेष म्हणजे या सर्व सामन्यांत फलंदाजांनी खोऱ्याने धावा काढताना गोलंदाजांची बेदम पिटाई केली. त्यामुळेच यंदा इंग्लंडमध्ये होणाºया विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजांपुढे मोठे आव्हान असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील यशस्वी गोलंदाजांची कामगिरी पाहिल्यास नक्कीच त्यातून यंदाच्या विश्वचषकातील गोलंदाजांना प्रेरणा मिळेल. विश्वचषक इतिहासामध्ये सर्वाधिक बळी घेण्यात आॅस्टेÑलियाचा ग्लेन मॅकग्रा आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या दोन स्थानांवर असून अव्वल दहामध्ये दोन भारतीय गोलंदाजांनीही स्थान मिळवले आहे.ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) :विश्वचषक स्पर्धेत ७० हून अधिक बळी घेणारा एकमेव गोलंदाज असलेला मॅकग्रा या स्पर्धेतील सर्वांत यशस्वी गोलंदाज आहे. १९९६-२००७ या कालावधीत त्याने विश्वचषकातील ३९ सामने खेळताना १८.१९च्या सरासरीने ७१ बळी घेतले आहेत. मॅकग्राच्याच नावावर १५ धावांत ७ बळी या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद आहे. तसेच त्याने दोनवेळा सामन्यात ५ किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची कामगिरीही केली आहे.
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) :विश्वचषकातील दुसºया क्रमांकाचा सर्वांत यशस्वी गोलंदाज असलेल्या मुरलीधरनच्या नावावर ६८ बळींची नोंद आहे. कारकिर्दीत ५ विश्वचषक स्पर्धा खेळताना त्याने ४० सामन्यांत १९.६३ च्या सरासरीने प्रतिस्पर्धी फलंदाजांची ‘फिरकी’ घेतली आहे. १९ धावांत ४ बळी ही मुरलीधरनची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
जेकब ओरम (न्यूझीलंड) :वेगवान गोलंदाज ओरमने २००३ ते २०११ दरम्यान तीन विश्वचषक स्पर्धा खेळताना २३ सामन्यांतून ३६ बळी मिळविले. ३९ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.वसीम अक्रम (पाकिस्तान) :अचूकता आणि भेदक स्विंग गोलंदाजीने फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या अक्रमने पाच विश्वचषक स्पर्धा खेळताना ३८ सामन्यांत २३.८३च्या सरासरीने ५५ बळी घेतले आहेत. १९८७ ते २००३ दरम्यानच्या विश्वचषक स्पर्धा खेळताना अक्रमची सर्वोत्तम कामगिरी २८ धावांत ५ बळी अशी आहे.
झहीर खान (भारत) :विश्वचषकातील यशस्वी अव्वल पाच गोलंदाजांमध्ये समावेश असलेला झहीर भारताचा एकमेव गोलंदाज. स्विंग आणि भेदक यॉर्करसाठी ओळखला जाणाºया झहीरने २००३ ते २०११ दरम्यान तीन विश्वचषक स्पर्धांत भारतासाठी भेदक मारा केला. त्याने २३ सामन्यांत २०.२२च्या सरासरीने मारा करताना ४४ बळी मिळविले. ४२ धावांत ४ बळी अशी त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.