सिडनी : उस्मान ख्वाजाच्या नवव्या कसोटी शतकाच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरोधात चौथ्या ॲशेस कसोटीत दुसऱ्या दिवशी आठ गड्यांच्या मोबदल्यात ४१६ धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने एकही गडी न गमावता १३ धावा केल्या होत्या. २०१९ नंतर पहिली कसोटी खेळणाऱ्या ख्वाजाला, ट्रेविस हेड हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ऑस्ट्रेलियन संघात जागा मिळाली आहे.
ख्वाजाने स्मिथ (६७) सोबत शतकी भागीदारी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डावात सूत्रधाराची भूमिका निभावली. त्याने २०६ चेंडूंमध्ये १३७ धावा केल्या. त्यात स्टुअर्ट ब्रॉडने दुसऱ्या नव्या चेंडूने ऑस्ट्रेलियाला सलग दोन झटके दिले. त्याने १०१ धावा देत पाच बळी मिळवले. दुसऱ्या दिवसअखेरीस हसीब हमीद व जॅक क्राऊली हे प्रत्येकी दोन धावा करून खेळत होते. इंग्लंड पहिल्या डावात ऑस्ट्रेलियापेक्षा ४०३ धावांनी मागे आहे.
इंग्लंडने लंच ब्रेकनंतर दुसरा नवा चेंडू घेतला. त्याचा फायदा त्यांना मिळाला. दुसऱ्या बाजूने विकेट जात असतानादेखील ख्वाजाने २०१ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. त्याला ३० धावांवर असताना जीवदान मिळाले होते. जॅक लीचच्या चेंडूवर रुटने त्याचा झेल सोडला होता. त्याने यासोबतच कसोटीत तीन हजार धावांचा पल्ला गाठला. त्याच्या खेळीची अखेर ब्रॉडनेच केली. तो बाद झाला तेव्हा जवळपास २५ हजार प्रेक्षकांनी त्याला अभिवादन केले.
ख्वाजाच्या पत्नीचे जोरदार सेलिब्रेशनउस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलियाचा कमबॅक किंग ठरला आहे. त्याने बऱ्याच काळानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात पुनरागमन केले आहे. ट्रॅविस हेडला दुखापत झाल्याने ख्वाजाला संघात स्थान मिळाले. तो मूळ पाकिस्तानी वंशाचा आहे. त्याने या सामन्यात शतक करताच त्याची पत्नी रेचेल हिने त्याच्या मुलीला कडेवर घेत मैदानातील स्टॅण्डमध्येच जोरदार सेलिब्रेशन केले. रेचेल आणि ख्वाजा यांनी २०१८ मध्ये लग्न केले होते.