travis head vs india : ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून तमाम भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना संघर्ष करावा लागला. विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमानांनी कसाबसा २४० पर्यंत स्कोअर नेला. पण, धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. आपल्या संघाची खराब कामगिरी पाहून भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा होती... अशातच ऑस्ट्रेलियाच्या हेडने भारताची डोकेदुखी वाढवून भारतीयांच्या जखमेवर प्रहार केला. अखेर कांगारूंनी सहा गडी राखून विजय मिळवला आणि सहाव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.
दरम्यान, ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीमुळे तो भारतीयांसाठी खलनायक ठरला. हेडने ४ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १२० चेंडूत १३७ धावांची अप्रतिम खेळी केली. त्याच्याच खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला विश्वचषक उंचावण्यात यश आलं. हेड आगामी काळातील सुपरस्टार असल्याची भविष्यवाणी ऑस्ट्रेलियन दिग्गज दिवंगत शेन वॉर्ननं केली होती. हेडच्या मॅचविनिंग खेळीनंतर वॉर्नची सात वर्षांपूर्वीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शेन वॉर्ननं सात वर्षांपूर्वी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, मी एक क्रिकेटपटू म्हणून ट्रॅव्हिस हेडचा मोठा चाहता आहे. भविष्यात तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमसाठी ऑस्ट्रेलियाचा मोठा स्टार असेल असा मला विश्वास आहे." वॉर्ननं केलेली भविष्यवाणी खरी झाल्याचे दिसते. विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून त्यानं सुपरस्टार असल्याचं दाखवून दिलं.
भारताचा दारूण पराभवनाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले. विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला.