मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यात आतापर्यंतची सर्वांत वाईट कामगिरी केली असून, या दौऱ्यात मोठ्या चुका केल्याचे मत माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने व्यक्त केले आहे. आपल्या सहकाऱ्यांचे कान टोचताना क्लार्क म्हणाला, ‘९ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी कुठलाही सराव सामना न खेळणे ही संघाची घोडचूक होती.
सराव सामन्याऐवजी पॅट कमिन्सने बंगळुरू येथे लहान सराव शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य दिले. त्याआधी मायदेशातही भारतासारखी परिस्थिती निर्माण करून सरावाचा पर्याय निवडला. दोन आठवड्यांनंतर आमचा संघ मालिकेत ०-२ ने मागे आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्याची संधीही गमावली. मी जे पाहतो, त्याचे आश्चर्य होत नाही; कारण आम्ही सराव सामना खेळलाच नाही. ही सर्वांत मोठी चूक होती. किमान एक सामना खेळायला हवा होता.’
ट्रॅव्हिस हेडला वगळलेक्लार्कच्या मते, पहिल्या कसोटीत ट्रॅव्हिस हेडला खेळवायला हवे होते. हेडने दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या डावात ४६ चेंडूंत सर्वाधिक ४३ धावा केल्या, तर संघ ११३ धावांत गारद झाला. तो पहिल्यांदाच सलामीला खेळला. पहिल्या कसोटीसाठी संघ निवड चुकीची होती. दुसऱ्या कसोटीत फलंदाजांनी स्वीप फटके मारणे योग्य नव्हते. डावाच्या सुरुवातीला स्वीप फटके मारणे चुकीचे ठरते. चेंडू उसळी घेत नसलेल्या खेळपट्टीवर स्वीप आणि रिव्हर्स स्वीप फटके मारताना अर्धा संघ बाद झाला. जोखीम पत्करून खेळत असाल तरी, स्वत:चा बळी बक्षिस रूपात देऊ नका. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर फलंदाजी कशी करायची हे भारताकडून शिकले पाहिजे, असे सांगत क्लार्क पुढे म्हणाला, ‘भारतातील परिस्थितीची आम्हाला चांगली जाण आहे, या आवेगातच तुम्ही खेळताना दिसलात. आम्ही २०० धावा केल्या असत्या तरी सामना जिंकू शकलो असतो. एक बाद ६० वरून आम्ही नऊ बळी ५२ धावांत दिले. भारताला ११५ धावांचे लक्ष्य मिळाले तेव्हा त्यांनी मात्र चार गड्यांच्या मोबदल्यात विजयी उद्दिष्ट गाठले.’ रविवारी कमिन्सने जे क्षेत्ररक्षण लावले, त्यावर क्लार्क म्हणाला, ‘संघाचे डावपेच इतके फसवे ठरले यावर विश्वास बसत नाही. ११५ धावांचे रक्षण करताना कमिन्सने सीमारेषेवर चार खेळाडू उभे केले. सामन्यात अडीच दिवसांचा खेळ शिल्लक होता.’
फलंदाज, फिरकीपटू अपयशीसुरुवातीच्या दोन्ही कसोटींत ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आणि फिरकी गोलंदाजांच्या उणिवा चव्हाट्यावर आल्या. नवी दिल्लीत फलंदाजांनी स्वीपचे फटके मारून फिरकीवर मात करण्याचे प्रयत्न केले; मात्र रणनीती फसली.