लंडन : इंग्लंडने पाचव्या आणि अखेरच्या ॲशेस कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्या ऑस्ट्रेलियाला हादरे दिले खरे, परंतु स्टीव्ह स्मिथचे झुंजार अर्धशतक टॉड मर्फीची आक्रमक फटकेबाजी या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १२ धावांची नाममात्र आघाडी घेतली. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला १०३.१ षटकांत २९५ धावांत गुंडाळले.
प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर स्मिथने एकाकी झुंज देताना १२३ चेंडूंत ६ चौकारांसह ७१ धावा केल्या. त्याने कर्णधार पॅट कमिन्ससोबत आठव्या गड्यासाठी १०३ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील ही पहिली अर्धशतकी भागीदारी ठरली. ख्रिस वोक्सने ३, तर स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वूड आणि जो रुट यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. मर्फीने ३९ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३४ धावांचा चोप देताना कांगारूंना आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली.
धावफलक इंग्लंड (पहिला डाव) : ५४.४ षटकांत सर्वबाद २८३ धावा. ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १०३.१ षटकांत सर्वबाद २९५ धावा (स्टीव्ह स्मिथ ७१, उस्मान ख्वाज ४७, पॅट कमिन्स ३६, टॉड मर्फी ३४; ख्रिस वोक्स ३/६१, स्टुअर्ट ब्रॉड २/४९, मार्क वूड २/६२.)
स्मिथच्या धावबादवर गोंधळ
सामन्यात ७८व्या षटकात कमिन्स-स्मिथ यांचा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जवळजवळ चुकलाच होता. यावेळी स्मिथविरुद्ध धावबादचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला होता. स्मिथ तंबूत जाण्यासही निघाला. मात्र, तिसरे पंच नितीन मेनन यांनी त्याला नाबाद ठरविले. यावेळी स्मिथ ४२ धावांवर होता. इंग्लंडचा यष्टिरक्षक जॉनी बेयरस्टो याने चेंडू हातात येण्याआधीच ग्लोव्हजने स्टम्प हलवल्याचे दिसल्याने स्मिथ नाबाद ठरला.