नवी दिल्ली : वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यामुळे इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनलमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे पारडे जड राहील, असे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी म्हटले आहे. जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंतच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला फटका बसू शकतो, असेही चॅपेल यांनी म्हटले आहे.
बुमराह आणि पंत यांच्याव्यतिरिक्त श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल हे दोन अन्य भारतीय खेळाडूही जखमी आहेत. त्यामुळे तेदेखील अंतिम लढतीत खेळू शकणार नाहीत. चॅपेल म्हणाले की, सातत्याने जखमी होणारा हार्दिक पांड्या कसोटीत खेळू शकणार नसल्याने भारताचे नुकसान होऊ शकते. हार्दिकने २०१८मध्ये शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. ‘ईएसपीएल क्रिकइन्फो’वर लिहिलेल्या लेखात चॅपेल म्हणतात की, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांच्या दुखापतीमुळे भारतीय संघ प्रभावित होईल. कारण हे दोघेही अत्यंत शानदार खेळाडू आहेत. हार्दिक पांड्याची आश्चर्यकारक अनुपस्थिती भारतीय संघाला नुकसान पोहोचवू शकते. कारण पांड्याने अष्टपैलू कामगिरी करून अनेकदा संघाला तारले आहे.
अनेक भारतीय खेळाडू दोन महिले आयपीएल खेळल्यानंतर डब्ल्यूटीसी फायनलमध्ये खेळतील. मात्र, त्याचा नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता चॅपेल यांनी व्यक्त केली आहे.
चॅपेल म्हणाले की, डब्ल्यूटीसी फायनल सामन्याबाबत कोणतीही भविष्यवाणी करता येणार नाही. दुखापती आणि वर्षाच्या सुरुवातीपासून कोणत्याही संघाने कसोटी सामना खेळलेला नाही. स्थिती अतिशय कठीण असेल, कारण अधिकाधिक खेळाडू कसोटी सामन्याच्या आधी केवळ आयपीएल खेळलेले आहेत. ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड हे अतिशय प्रभावी गोलंदाज आहेत. भारताचे मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव हेदेखील शानदार कामगिरी करत आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत विकेट घेण्यात ते अपयशी ठरतात, असेही चॅपेल म्हणाले.
भारताची फिरकी बलाढ्य
चॅपेल म्हणाले की, दोन्ही संघांचीही कसोटीसाठी आदर्श तयारी झालेली नाही. मात्र, २००९ मध्ये रवी बोपारा आयपीएल खेळल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत खेळण्यास उतरला होता. त्याच्या पायाची हालचाल चांगली होती आणि तो अतिशय सकारात्मक होता. बोपाराने कॅरेबियन देशात सलग शतके झळकावली होती. ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी प्रभावी आहे, तर फिरकीमध्ये रोहित शर्माचा संघ बलाढ्य आहे.
Web Title: Australia's Parde Jad for WTC finals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.