लंडन : ॲशेस मालिकेच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत गुरुवारी यजमान इंग्लंड संघ पहिल्याच दिवशी संकटात सापडला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत इंग्लंडचा पहिला डाव २८३ धावात गुंडाळला. मिचेल स्टार्कने सर्वाधिक चार बळी घेतले. दिवसअखेर कांगारुंनी २५ षटकांत १ बाद ६१ धावा केल्या होत्या.
तत्पुर्वी, मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांच्या भेदक माऱ्यापुढे यजमान इंग्लंडचे फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरले. मालिकेत पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेवर आधीच ताबा मिळविलेला आहे. इंग्लंडने आक्रमक सुरुवात करीत ६० चेंडूत बिनबाद ५० धावा काढल्या. १२ व्या षटकांत बेन डकेट हा रिव्ह्यूवर बाद झाला. मिशेल मार्शच्या चेंडूवर यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने त्याचा झेल टिपला. कर्णधार पॅट कमिन्सने पुढच्या षटकात झॅक क्रॉलेला स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेल देण्यास भाग पाडले. रूट हेजलवूडच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला.
यानंतर ब्रुकने सकारात्मक खेळून ९१ चेंडूत ११ चौकार आणि दोन षटकारांसह सर्वाधिक ८५ धावा काढल्या. त्यानंतर ख्रिस वोक्स आणि मार्क वूडने ४९ धावांची भागीदारी करत इंग्लंडला अडीचशेचा टप्पा ओलांडून दिला. प्रत्युत्तरात चांगली सुरुवात केल्यानंतर डेव्हिड वॉर्नर परत तीशीत बाद झाला. त्यानंतर ख्वाजा आणि लाबूशेन यांनी सावध पवित्रा घेत अधिक पडझड होऊ दिली नाही.
इंग्लंड पहिला डाव : ५४.४ षटकांत सर्वबाद २८३ धावा (बेन डकेट ४१, मोइन अली ३४, हॅरी ब्रुक ८५, ख्रिस वोक्स ३६) गोलंदाजी : मिचेल स्टार्क ८२-४, जोश हेजलवडून ५४-२, पॅट कमिन्स ६६-१, मिशेल मार्श ४३-१, टॉड मर्फी २२-२ बळी.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : २५ षटकांत १ बाद ६१ धावा (डेव्हिड वॉर्नर २४, उस्मान ख्वाजा खेळत आहे २६, मार्नस लाबूशेन खेळत आहे २). गोलंदाजी : ख्रिस वोक्स ८-१.
Web Title: Australia's 'shock' to England; Fifth Ashes Test: 283 runs on the first day
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.