Australia’s tour of New Zealand 2024: न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या घरच्या मालिकेला मुकणार आहे. विल्यमसनने वैयक्तिक कारणास्तव आगामी मालिकेतून माघार घेतल्याचे कळते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे.
विल्यमसन तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी सारा रहीम गर्भवती असल्याने विल्यमसनने कुटुंबाला वेळ देण्यासाठी क्रिकेटमधून सुट्टी घेतली. सारा आणि केन आधीच एक मुलगी आणि एका मुलाचे पालक आहेत. माहितीनुसार, विल्यमसनच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होत असल्याने त्याला पत्नीसोबत राहायचे आहे. म्हणूनच तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेत न्यूझीलंडच्या संघासोबत नसेल.
विल्यमसन तिसऱ्यांदा होणार बाबा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला २१ फेब्रुवारीपासून विल्मिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २३ आणि २५ फेब्रुवारी रोजी ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळवला जाईल.
दरम्यान, केन विल्यमसन सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडच्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या समाप्तीनंतर तो मायदेशी परतेल. हा सामना १३ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी केन विल्यमसन निवडीसाठी उपलब्ध असेल.