ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा आणि आयसीसी यांच्यात सध्या आमने-सामनेची लढाई सुरू आहे. आयसीसीने फटकारल्यानंतरही उस्मान ख्वाजाच्या भूमिकेत आणि कृतीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. प्रत्येकवेळी कुठली ना कुठली नवी पद्धत शोधून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेला ठेंगा दाखवत आहे. एवढंच नाही तर त्याला आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडूनही पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजा याने असं काही केलं की, जे पाहून सारेच अवाक् झाले आहेत.
त्याचं झालं असं की, उस्मान ख्वाजा हा पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ दंडावर काळी पट्टी बांधून उतरला होता. त्यानंतर आयसीसीने त्याला फटकार लगावली होती. तसेच पुढे असं काही न करण्याची ताकीद दिली होती. त्यानंतर उस्मान ख्वाजा याने बॅट आणि बुटांवर ब्लॅक डव्हचा स्टिकर लावण्याची परवानगी मागितली होती. आयसीसीने अशी परवानगी देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. ब्लॅक डव्ह पॅलेस्टाइनमध्ये शांतता आणि स्वातंत्र्याचं प्रतीक मानलं जातं.
आता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात मंगळवारपासून बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात उस्मान ख्वाजा हा जेव्हा फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्याच्या दोन्ही बुटांवर त्याच्या मुलींची नावं लिहिलेली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ख्वाजाचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये एका बुटावर आएशा तर दुसऱ्या बुटावर आएला लिहिलेलं होतं. दरम्यान, बॉक्सिंग डे कसोटीमध्ये उस्मान ख्वाजा ४२ धावा काढून बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने डेव्हिड वॉर्नरसोबत ९० धावांची भागीदारी केली होती.