भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना कोलंबो येथे दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा भारताचा सामना करण्यापूर्वीच झाला आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांना हा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाने काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा वन डे सामना १२३ धावांनी जिंकून मोठा पराक्रम केला. या विजयामुळे ऑस्ट्रेलिया आयसीसी वन डे क्रमवारीत पुन्हा नंबर १ संघ बनला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने हे स्थान पटकावले होते, परंतु त्यांच्याकडे हा ताज काही दिवसांचा पाहूणा म्हणूनच राहिला. आता पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे आणि आज भारताकडून पराभूत झाल्यास त्यांची आणखी घसरण होईल.
ऑस्ट्रेलियाने काल डेव्हिड वॉर्नर ( १०६) व मार्नस लाबुशेन ( १२४) यांच्या शतकांच्या जोरावर दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८ बाद ३९२ धावांचे डोंगर उभे केले. ऑस्ट्रेलियाने पहिली मॅचही लाबुशेनच्या ८० धावांच्या जोरावर जिंकली. कॅमेरून ग्रीनला दुखापत झाल्याने कन्कशन नियमाप्रमाणे लाबुशेन फलंदाजीला आला अन् मॅच विनर ठरला. कालच्या सामन्यातही त्याने वॉर्नरसोबत डाव सावरला अन् नंतर शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या ३९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २६९ धावांत तंबूत परतला. अॅडम झम्पाने ४८ धावांत ४ विकेट्स घेतल्या. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने १२१ रेटींग पॉईंटसह अव्वल स्थान पटकावले, तर पाकिस्तान १२० रेटींग पॉईंटसह दुसऱ्या स्थानी सरकला.
वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने नेहमीच दबदबा राखला आहे. २०२२च्या हंगामत त्यांना घरच्या मैदानावर श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. परंतु, त्यानंतर त्यांनी पराभवाचे तोंड पाहिलेलं नाही. झिम्बाब्वेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर त्यांनी न्यूझीलंडला घरच्या मैदानावर ३-० असे नमवले. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी इंग्लंडला व्हाईटवॉश दिला. मार्च २०२३ मध्ये त्यांनी भारताला पराभूत केले आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीय. भारतीय संघ ११४ रेटींग पॉईंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.