नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या धरतीवर आशिया चषक खेळत आहे. शनिवारी आयसीसीने महिलांची एकदिवसीय आणि टी-२० ची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय महिला संघ एकदिवसीय आणि टी-२० मध्ये चौथ्या क्रमांकावर कायम आहे. भारताने एकदिवसीय क्रमवारीत एक गुण मिळवला असून आता एकूण १०४ गुण झाले आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टी-२० मध्ये ४ गुण मिळवले असून आता एकूण २६६ गुण झाले आहेत.
दरम्यान, आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. २०२१-२२ या कालावधीतील सामन्यांचे मूल्यांकन करून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रमवारीत विक्रमी फरकाने अव्वल स्थान कायम राखले आहे, तर टी-२० संघाच्या क्रमवारीतही त्यांनी आघाडी घेतली आहे.
क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या महिलांचा दबदबाराष्ट्रकुल स्पर्धा आणि विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेवरील आघाडी ४८ वरून ५१ एवढ्या फरकाने वाढवली आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही खेळाच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष किंवा महिला संघाची सर्वात मोठी आघाडी आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ सलामीच्या आणि अंतिम सामन्यात आमनेसामने आले होते. मात्र दोन्हीही वेळा कांगारूच्या संघाने बाजी मारून आपले वर्चस्व राखले होते.
ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडवरची आघाडी १४ वरून १८ गुणांवर वाढली आहे. मात्र एकदिवसीय क्रमवारीत संघांच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियाने तीन रेटिंग गुणांच्या वाढीसह त्यांचे एकूण रेटिंग गुण १७० वर नेले आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिका (११९), इंग्लंड (११६), भारत (१०४) आणि न्यूझीलंड (१०१) यांचा क्रमांक लागतो. टी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचे एकूण २९९ रेटिंग गुण आहेत. त्यापाठोपाठ इंग्लंड, न्यूझीलंड, भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघांचा क्रमांक लागतो.