ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता माजी कर्णधार मायकेल क्लार्कच्या खासगी आयुष्यात पुन्हा एकदा वादळ आले आहे. मायकेल क्लार्कने आपल्याला दगा दिल्याचा आरोप त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रॉज हिने केला आहे. तसेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात क्लार्कची प्रेयसी क्लार्कवर थपडांची बरसात करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या अखेरीस क्लार्क जेड यारब्रॉज हिची बहीण जॅस्मिन हिला बुक्का मारताना दिसत आहेत. डेली टेलिग्राफने क्लार्क आणि जेड यारब्रॉज यांच्यात झालेल्या या हाणामारीबाबत पोस्टही शेअर केली आहे.
या व्हिडीओमध्ये मायकेल क्लार्क शर्टलेस झालेला दिसत आहे. तसेच तो त्याच्यावर झालेले आरोप फेटाळून लावताना दिसत आहे. मी शपथ घेऊन सांगतो की हे खरं नाही आहे. मी माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, असे मायकेल क्लार्क सांगताना दिसत आहे. रिपोर्टनुसार मायकेल क्लार्क त्याची प्रेयसी जेड यारब्रॉज, तिची बहीण जॅस्मिन आणि तिचा पती कार्ल स्टेफनोविक यांच्यासोबत सुट्टीवर गेला होता. हे चौघेही आपल्या मित्रांसोबत डिनरवर होते, तेव्हाच हा वाद झाला. यारब्रॉजची बहीण जॅस्मिन ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टीव्ही होस्ट आहे.
एकेकाळचा स्टार खेळाडू असलेल्या मायकेल क्लार्कचं वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त राहिलेले आहे. त्याचं नाव सर्वप्रथम मॉडेल लारा बिंगेल हिच्याशी जोडलं गेलं होतं. २००७ मध्ये त्यांनी डेटिंग सुरू केली होती. सन २०१० मध्ये बिंगलचे शॉवर खालील फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर मोठा वाद झाला होता. त्यानंतर क्लार्क आणि बिंगल वेगळे झाले होते. २०१२ मध्ये मायकेल क्लार्कने कायली बोल्डी हिच्याशी विवाह केला होता. त्यांनी २०१५ मध्ये एका मुलीला जन्म दिला होता. मात्र २०२० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर क्लार्कने फॅशन डिझायनर पिप एडवर्ड्सला डेट करायला सुरुवात केली. मात्र पिपसोबतही त्याचं ब्रेकअप झालं.
दरम्यान, फुटेज समोर आल्यानंतर क्विंन्सलँड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी सांगितले की, क्विंन्सलँड पोलीस एक ३० वर्षीय महिला आणि एका ४१ वर्षीय व्यक्तीदरम्यान घडलेल्या घटनेची चौकशी करत आहेत. क्लार्क हा ४१ वर्षांचा आहे. तर त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रॉज ३० वर्षांची आहे.