ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातली दुसरी कसोटी आजपासून सुरु झाली. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला. केन विलियम्सनला दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घ्यावी लागली आणि त्याच्याजागी कर्णधारपद टॉम लॅथमकडे सोपवण्यात आले. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात शतकी खेळी करून ऑसी फलंदाजानं 2020मधील पहिल्या शतकवीराचा मान पटकावला. विशेष म्हणजे 2019 या कॅलेंडर वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही त्याच्याच नावावर होता.
Video : स्टीव्ह स्मिथची पहिली धाव अन् चाहत्यांच्या आनंदाला उधाण, नेमकं अस झालं तरी काय?
डेव्हिड वॉर्नर आणि जो बर्न्स या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 39 धावा जोडल्या. कॉलीन डी ग्रँडहोमनं ऑसींना पहिला धक्का दिला. त्यानं बर्न्सला 18 धावांवर माघारी पाठवले. वॉर्नर आणि लॅबुश्चॅग्ने या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. नील वॅगनरनं ऑसींचा दुसरा फलंदाज माघारी पाठवला. वॉर्नर 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर स्मिथ आणि लॅबुश्चॅग्ने यांनी दमदार खेळ केला. लॅबुश्चॅग्नेनं 2019मधील आपला फॉर्म 2020मध्येही कायम राखताना अर्धशतकी खेळी केली. त्याला स्मिथकडून चांगली साथ लाभली.
स्मिथ आणि लॅबुश्चॅग्ने यांनी तिसऱ्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी केली. पण, स्मिथ 182 चेंडूंत 4 चौकारांसह 63 धावा करून माघारी परतला. त्यानंतर लॅबुश्चॅगेनं दमदार खेळी करताना संघाला पहिल्या दिवसअखेर 3 बाद 283 धावांपर्यंत मजल मारून दिली. लॅबुश्चॅगेनं 210 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 130 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे चौथे शतक ठरले. त्यानं 2019च्या कॅलेंडर वर्षात तीन शतकांसह सर्वाधिक 1104 धावा केल्या होत्या. तोच फॉर्म कायम राखताना त्यानं 2020मधील पहिल्या शतकवीराचा मान पटकावला.