INDvsAUS : Smriti Mandhanaची अर्धशतकी खेळी व्यर्थ, टीम इंडियाला नमवून ऑस्ट्रेलियाची जेतेपदाला गवसणी

स्मृती मानधनानं दमदार फटकेबाजी करून तोंडाशी आणलेल्या विजयी घासाची चव भारतीय महिला संघाला चाखता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 11:24 AM2020-02-12T11:24:33+5:302020-02-12T11:28:31+5:30

whatsapp join usJoin us
AUSWvINDW, Tri-Nation Women's T20 Series Final: Australia won title, beat India by 11 runs | INDvsAUS : Smriti Mandhanaची अर्धशतकी खेळी व्यर्थ, टीम इंडियाला नमवून ऑस्ट्रेलियाची जेतेपदाला गवसणी

INDvsAUS : Smriti Mandhanaची अर्धशतकी खेळी व्यर्थ, टीम इंडियाला नमवून ऑस्ट्रेलियाची जेतेपदाला गवसणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

स्मृती मानधनानं दमदार फटकेबाजी करून तोंडाशी आणलेल्या विजयी घासाची चव भारतीय महिला संघाला चाखता आली नाही.  स्मृतीच्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियानं सामन्यात पुनरागमन केले. त्यांनी भारतीय संघाला एकामागोमाग धक्के दिले. तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियानं हा सामना 11 धावांनी जिंकून जेतेपद नावावर केले.

इंग्लंडचा पत्ता कट करून तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघानं भारतासमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं. बेथ मूनीची नाबाद अर्धशतकी खेळी आणि अखेरच्या षटकांत राचेल हायनेसनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 6 बाद 155 धावांचा समाधानकारक पल्ला गाठला. अखेरच्या तीन  षटकांत मूनी आणि राचेल यांनी 41 धावा चोपून काढल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. दीप्ती शर्माच्या पहिल्याच षटकात अ‍ॅलीसा हिली ( 4) माघारी परतली. त्यानंतर मूनी आणि अ‍ॅशलेघ गार्डनर यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अरुंधती रेड्डीनं ही भागीदारी मोडली. तिनं गार्डनरला ( 26) माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या कर्णधार मेन लॅगिंगनं ( 26) तिसऱ्या विकेटसाठी मूनीसह अर्धशतकी भागीदारी केली. 

लॅनिंग माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के बसले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया मोठा पल्ला गाठणार नाही असे वाटत होते. 17 षटकांत ऑस्ट्रेलियाच्या 114 धावा झाल्या होत्या. पण, मूनी एका बाजूनं खिंड लढवत होते. तिला हायनेसची साथ मिळाली. या दोघींनी 11 चेंडूंत 30 धावा चोपल्या. हायनेसनं 7 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार खेचून 18 धावा केल्या. मूनी 54 चेडूंत 9 चौकारांसह 71 धावांवर नाबाद राहिली.

लक्ष्याचा पाठलाग करताना शेफाली वर्मानं शानदार टोलेबाजी करून सकारात्मक सुरुवात केली, परंतु तिला फार काळ खेळपट्टीवर टीकता आलं नाही. दुसऱ्याच षटकात शेफाली ( 10) माघारी परतली. आजच्या सामन्यात जेमिमा रॉड्रीग्जच्या जागी रिचा घोषला बढती मिळाली. तिनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना स्मृती मानधनासह 43 धावा जोडल्या. अ‍ॅनाबेल सदरलँडनं ही भागीदारी संपुष्टात आणली. रिचा 17 धावांवर माघारी परतली. जेमिमाही अवघ्या दोन धावा करून टाल्या व्ह्लॅमिंकच्या गोलंदाजीवर माघारी परतली. व्ह्लॅमिंकची ही दुसरी विकेट ठरली. दहा षटकांत भारताचे तीन फलंदाज 69 धावांवर माघारी परतले होते.

स्मृतीनं एक बाजून लावून धरताना अर्धशतक झळकावलं. तिनं 29 चेंडूंत 9 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. 15 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर निकोला कॅरीनं अप्रतिम झेल घेत स्मृतीला माघारी परतण्यास भाग पाडले. स्मृती 37 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीनं 66 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर ( 14) झटपट माघारी परतली. भारतासाठी हा मोठा धक्काच होता. त्याच षटकात अरुंधती रेड्डी ( 0) लाही जेस जोनासेननं माघारी पाठवून टीम इंडियाला बॅकफूटवर टाकले. टीम इंडियाचे 4 फलंदाज 13 धावांत माघारी परतले. तानिया भाटीयानं 19व्या षटकात फटकेबाजी करून टीम इंडियाचे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. टीम इंडियाला अखेरच्या षटकांत विजयासाठी 15 धावांची आवश्यकता होती, परंतु ऑसींच्या टिच्चून माऱ्यासमोर ते अपयशी ठरले. टीम इंडियाचा संपूर्ण संघ 144 धावांत माघारी परतला.

 

Web Title: AUSWvINDW, Tri-Nation Women's T20 Series Final: Australia won title, beat India by 11 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.