Avesh Khan Bouncer IND vs SA Video: राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ८२ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या T20I मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. आता पाचवा सामना १९ जून (रविवार) रोजी बंगळुरूमध्ये खेळवला जाईल. वेगवान गोलंदाज आवेश खानने भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने चार बळी घेतले. याचदरम्यान त्याच्या बाऊन्सर चेंडूने आफ्रिकेचा फलंदाज कळवळला आणि १० मिनिटं खेळ थांबवण्याचीही परिस्थिती ओढवली होती.
पहिल्या तीन सामन्यांमध्ये आवेशला एकही विकेट घेता आली नाही. सामन्या दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या १४व्या षटकात आवेश खानने एक वेगवान बाऊन्सर टाकला. त्यावर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज मार्को यान्सेन दुखापतग्रस्त झाला. बाऊन्सर चेंडू डोक्यावर आदळला आणि यान्सने वेदनांनी आक्रोश करताना दिसला. आफ्रिकन संघाचे फिजिओ तात्काळ मैदानात दाखल झाले. भारतीय खेळाडूही यान्सेनला पाहण्यासाठी गेले. या प्रकारामुळे १० मिनिटं खेळ थांबलेला होता अखेर १० मिनिटांनी खेळ सुरू झाला. पाहा व्हिडीओ-
यान्सेनला या धक्क्यातून सावरण्यासाठी थोडा वेळ लागला. त्यामुळे खेळ सुमारे १० मिनिटे थांबवण्यात आला. मात्र, खेळ सुरू झाल्यानंतर यानसेनला फार काही करता आलं नाही. पुढच्याच चेंडूवर त्याची विकेट गेली. आवेशने यानसेनला ऋतुराज गायकवाडकरवी झेलबाद केले. मार्को यान्सेनने १२ धावा केल्या. तत्पूर्वी नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद १६९ धावा केल्या. दिनेश कार्तिकने सर्वाधिक ५५ आणि हार्दिक पंड्याने ४६ धावा केल्या. १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ ८७ धावांत गारद झाले. रॅसी व्हॅन डर डुसेन (२०), क्विंटन डी कॉक (१४) आणि मार्को यान्सेन (१२) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.