नवी दिल्ली : सध्या विजय हजारे ट्रॉफी 2022चा थरार रंगला आहे. भारतीय संघातून वगळलेल्या आवेश खानने बुधवारी डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे घातक गोलंदाजी केली. त्याने सर्वोत्तम गोलंदाजी करून 6 बळी पटकावले. त्यामुळे मध्य प्रदेशने बडोद्याच्या संघावर 290 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या स्पर्धेच्या इतिहासातील मध्य प्रदेशचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे.
आवेश खानने दाखवला रूद्रावतार!
आवेश खानने 8 षटकांत केवळ 37 धावा देऊन 6 बळी पटकावले. त्यामुळे 350 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना बडोद्याच्या संघाला घाम फुटला. अखेर बडोद्याचा संघ 17.1 षटकांत केवळ 59 धावांवरच सर्वबाद झाला. लक्षणीय बाब म्हणजे प्रथम श्रेमी क्रिकेटमधील आवेश खानची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
मध्य प्रदेशचा 290 धावांनी मोठा विजय
तत्पुर्वी, बडोदाच्या संघाने नाणेफेक जिंकून मध्य प्रदेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेशच्या संघाने 7 बाद 349 धावांची विशाल धावसंख्या उभारली. मध्य प्रदेशकडून शुभम शर्माने सर्वाधिक 88 धावा केल्या. याशिवाय यश दुबे (58), हिमांशू मंत्री (60) आणि रजत पाटीदार (52) याने देखील अर्धशतकी खेळी करून धावसंख्या 300 पार नेली. खरं तर आवेश खान सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत शेवटच्या वेळी भारतीय संघाचा हिस्सा होता. न्यूझीलंड आणि बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळाले नाही.
आवेशशिवाय कुलदीप सेनने दोन, अश्विन दास आणि कुमार कार्तिकेय सिंग यांनी प्रत्येकी 1-1 बळी पटकावला. कुलदीप हा न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचा हिस्सा आहे. पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी 25 नोव्हेंबर होणार आहे, परंतु कुलदीप सेन अद्यापही भारतातच आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी एकदिवसीय संघ -
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
भारत विरूद्ध न्यूझीलंड वेळापत्रक
- 25 नोव्हेंबर - पहिला एकदिवसीय सामना, ईडन पार्क, ऑकलंड, सकाळी 7.30 वाजल्यापासून
- 27 नोव्हेंबर - दुसरा एकदिवसीय सामना, सेडन पार्क, हॅमिल्टन, सकाळी 7.30 वाजल्यापासून
- 30 नोव्हेंबर - तिसरा एकदिवसीय सामना, हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च, सकाळी 7.30 वाजल्यापासून
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Avesh Khan took 6 wickets against Baroda in the Vijay Hazare Trophy for Madhya Pradesh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.