smriti mandhana । मुंबई : महिला प्रीमिअर लीगमध्ये (WPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) संघाची स्थिती अत्यंत वाईट आहे. कागदावरील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक असलेला RCB अजूनही स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. काल स्मृती मानधनाच्या संघाला सलग तिसरा पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेतील सहाव्या सामन्यात गुजरात जायंट्सने आरसीबीचा 11 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 7 विकेट गमावून 201 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ 6 बाद केवळ 190 धावा करू शकला आणि सामना गमावला. कर्णधार स्मृती मानधना पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. काल झालेल्या सामन्यात तिने 14 चेंडूत 18 धावा केल्या.
दरम्यान, या स्पर्धेत स्मृती मानधनाच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कर्णधार म्हणून तिच्याकडे अनुभवाची कमतरता असल्याचे तिच्या रणनीतीवरून स्पष्ट होते. खरं तर या स्पर्धेत आतापर्यंत तिने 3 सामन्यात 25.33 च्या सरासरीने फक्त 76 धावा केल्या आहेत. आरसीबीच्या सलग तिसऱ्या पराभवामुळे आणि त्यांच्या खराब कामगिरीमुळे ट्विटरवर आरसीबीविरूद्ध भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
RCBच्या पराभवाची हॅटट्रिक स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने आरसीबीचा दारूण पराभव केला. काल झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सकडून पराभव झाल्याने आरसीबीला सलग तिसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"