आयपीएल २०२५ मध्ये दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलच्या नेतृत्वात संघाने दमदार कामगिरी करून दाखवली. दिल्लीने आतापर्यंत खेळलल्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. या कामगिरीसह अक्षर पटेलने खास विक्रमाला गवसणी घातली. अक्षर पटेल हा दिल्ली कॅपिटल्सचा पहिला कर्णधार बनला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने एका हंगामातील पहिले चार सामने जिंकले. या बाबतीत त्याने दिल्लीचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवागचा १६ वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अक्षर पटेल दिल्लीच्या संघाचे नेतृ्त्व करत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दिल्लीने लखनौ सुपर जायंट्सवर १ विकेटने रोमहर्षक विजय मिळवला. त्यानंतर दिल्लीने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव केला. त्यानंतर, अक्षर पटेलच्या सैन्याने सीएसकेचा २५ धावांनी पराभव केला. आता त्यांनी आरसीबीला ६ विकेट्सने पराभवाची धुळ चाखली.
याआधी भारताचा विकेटकिपर ऋषभ पंत दिल्लीच्या संघाचे नेतृत्व करत होता, जो आता लखनौकडून खेळत आहे. आयपीएल २०२५ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी अक्षर पटेल आणि केएल राहुल यांच्यात कर्णधारपदासाठी लढाई सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली संघाचे व्यवस्थापन केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवू इच्छित होते. परंतु, त्याने कर्णधारपद नाकारले. त्यानंतर कर्णधारपदासाठी अक्षर पटेलच्या नावासमोर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आयपीएलचा यंदाच्या हंगामात दिल्लीच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या चारही सामने जिंकले आहेत. आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, चांगल्या रनरेटमुळे गुजरातचा संघ आठ गुणांसह अव्वल स्थानी आहे. आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली हा सध्या एकमेव संघ आहे, ज्याने एकही सामना गमावलेला नाही.
Web Title: Axar Patel Creates History, Becomes 1st Delhi Capitals Captain To win first 4 matches of IPL season
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.