सौदी अरेबियातील जेद्दाह या शहरात पार पडलेल्या मेगा लिलावात खेळाडूंची शॉपिंग करत १० फ्रँचायझी संघांनी आगामी आयपीएल हंगामासाठी संघ बांधणी केल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्स संघाबाहेर पडल्यावर लिलावात उतरलेल्या रिषभ पंतवर लखनौ सुपर जाएंट्सनं विक्रमी बोली लावली. तो आता लखनौच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. एवढेच नाही तो कॅप्टन्सीचा चेहराही असू शकतो. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्समध्ये त्याची जागा कोण घेणार याचीही चर्चा आता रंगू लागली आहे.
DC नं मेगा लिलावात दोन कॅप्टन्सी टॅग चेहऱ्यांवर खेळला डाव
पंतसोबतच्या ब्रेकअपनंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ श्रेयस अय्यरवर मोठा डाव खेळेल, अशी अपेक्षा होती.पण तो काही त्यांच्या हाती लागला नाही. पंजाबच्या संघाने या गड्यासाठी मोठी रक्कम मोजली. मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने जी शॉपिंग केली त्यात दोन कॅप्टन्सीचे चेहरे आहेत. एक म्हणजे लोकेश राहुल आणि दुसरा आहे तो फाफ ड्युप्लेसिस. दिल्ली कॅपिटल्सनं केएल राहुलसाठी ४ कोटी मोजले असून दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवी स्टारला त्यांनी २ कोटी या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.
DC च्या कॅप्टन्सीच्या रेसमध्ये दोघांत तिसरा असा सीन
रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा भाग नसल्यामुळे या संघाला नवा कॅप्टन मिळणार हे चित्र आता एकदम स्पष्ट झाले आहे. त्यात दिल्ली कॅपिटल्सनं दोन कॅप्टन्सी टॅग असणारे चेहरे अर्थात RCB चं नेतृत्व करताना दिसलेला फाफ ड्युप्लेसिस आणि लखनौसह अन्य आयपीएल फ्रँचायझीचे नेतृत्व करणाऱ्या लोकेश राहुलला आपल्या ताफ्यात घेतल्यामुळे या दोघांतील एकाच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ पडेल, असे चित्र निर्माण झाले. पण संघ मालकाने या संघाच्या ताफ्यात कॅप्टन्सीसंदर्भात दोघात तिसरा सीन दिसू शकतो, अशी हिंट दिलीये. आता तो तिसरा चेहरा दुसरा कोणी नसून तो आहे रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली उप कॅप्टन्सीची जबाबादारी सांभाळणारा अक्षर पटेल.
भारतीय ऑल राउंडरला लागू शकते कॅप्टन्सीची लॉटरी
आयपीएलमध्ये याआधी नेतृत्वाचा अनुभव असल्यामुळे फाफ ड्युप्लेसीस आणि लोकेश राहुल हे दिल्ली कॅपिटल्सच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत आघाडीवर असणारे चेहरे वाटत होते. पण DC संघाचे सह मालक पार्थ जिंदाल यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत अक्षर पटेलचं कौतुक केल्यामुळे तो या शर्यतीत आता आघाडीवर असल्याचे दिसून येते. त्याला आगामी हंगामासाठी कॅप्टन्सीची लॉटरी लागू शकते.
कॅप्टन्सीवर काय म्हणाले पार्थ जिंदाल?
कॅप्टन्सीच्या मुद्यावर पार्थ जिंदाल म्हणाले की, सध्याच्या घडीला कॅप्टन्सीसंदर्भात बोलणे थोडे घाई केल्यासारखे होईल. अक्षर पटेल खूप दिवसांपासून संघासोबत आहे. संघ एकजूट ठेवण्यात तो तरबेज आहे. गत हंगामात तो उप कॅप्टनही होता, असा उल्लेख त्यांनी अक्षर पटेलसंदर्भात केला. ही गोष्ट अक्षर पटेलला कॅप्टन्सीच्या रेसमध्ये आघाडीवर नेणारी अशीच आहे. याशिवाय त्यांनी केएल राहुलसंदर्भातही भाष्य केले आहे. केएल राहुलला मी चांगले ओळखतो. पण आतापर्यंत त्याला भेटलेलो नाही. त्याच्या डोक्यात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. कॅप्टन्सीचा अंतिम निर्णय हा कोचिंग ग्रुप आणि अन्य सह मालक यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल. कॅप्टन्सीचा अनुभव असणाऱ्या दोघांमध्ये अक्षर पटेलची एन्ट्री झाली आहे. एवढेच नाही तर दोघांच्या नावावर जोर देत फाफ या शर्यतीतून आउट झाल्याचे दिसते. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा नवा कॅप्टन या दोघांपैकी एक असू शकतो, अशी हिंटच संघ सहमालकाने दिल्याचे दिसते.